अध्यक्षांची प्रकृती खालावली; आंदोलनस्थळीच सलाईन; साताऱ्यात संगणक परिचालकाचे उपोषण सुरुच
By नितीन काळेल | Published: January 24, 2024 06:42 PM2024-01-24T18:42:00+5:302024-01-24T18:43:46+5:30
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आंदोलनस्थळी..
सातारा : राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा परिषदेसमोर राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला नऊ दिवस पूर्ण झाले तरीही शासनदरबारी हालचाली नाहीत. तर राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांचे उपोषण सुरूच आहे. बुधवारी त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धारच त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले आहेत. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा. कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
दि. १६ जानेवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. तरीही शासनस्तरावर मागण्यांबाबत काहीही निर्णय झालेला नाही. तसेच अधिकाऱ्यांकडूनही काहीही सकारात्मक पावले उचलण्यात आलेली नाहीत. आतापर्यंत विविध राजकीय संघटना, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. तर संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुनीता आमटे यांचे नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे बुधवारी दुपारच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यानंतर आंदोलनस्थळीच त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आंदोलनस्थळी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी यात्रेसाठी दोन दिवस आले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संगणक परिचालक संघटनेचे शिष्टमंडळ दरे येथे गेले आहे. बुधवारी दुपारपर्यंततरी मुख्यमंत्र्यांशी मागण्यांबाबत चर्चा झाली नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. तर माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांची पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी बुधवारी दुपारी काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी उपोषणकर्त्या सुनीता आमटे यांच्याशी चर्चा केली. तसेच मागण्यांबाबत आम्ही सोबत असल्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन काही सूचनाही केल्या.