साताऱ्यात असंघटीत बांधकाम कामगारांचा आक्रोश मोर्चा

By नितीन काळेल | Published: October 19, 2023 06:58 PM2023-10-19T18:58:16+5:302023-10-19T18:58:35+5:30

घरासाठी जागा, दिवाळीपूर्वी बोनसची मागणी 

Protest march of unorganized construction workers in Satara | साताऱ्यात असंघटीत बांधकाम कामगारांचा आक्रोश मोर्चा

साताऱ्यात असंघटीत बांधकाम कामगारांचा आक्रोश मोर्चा

सातारा : सातारा जिल्ह्यातील असंघटीत बांधकाम कामगारांनी गुरुवारी घरासाठी जागा, दिवाळीपूर्वी बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मिनाक्षी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघाला. पोवई नाक्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माेर्चा आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

असंघटीत बांधकाम कामगारांचे प्रलंबित अर्ज निकाली काढून मंजूर करुन घ्यावेत, आॅनलाइन अर्जात चुकीच्या व मनमानी पध्दतीने त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्ज नामंजूर केले जात आहेत. नामंजूर अर्ज लवकरात लवकर मंजूर करावेत. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून पुरविले जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात अत्यंत खराब अन्न पुरविले जाते. त्यामुळे ही योजना बंद करुन त्या बदल्यात कामगारांना कोरडा शिधा पुरवावा किंवा एक हजार रुपये द्यावेत. 

बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून कामगारांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी १० हजार बोनस देण्यात यावा, सातारा जिल्ह्यातील हजारो बेघर कामगारांना स्वत:चे घर बांधण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करुन द्यावी. ६० वर्षांवरील कामगारांना तत्काळ पेन्शन योजना सुरू करावी, सातारा जिल्हा बांधकाम कामगार मंडळाच्या कामगार आयुक्तालयातील सर्व पदे भरुन गैरसोय टाळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात योगेश पोळ, भानुदास डाईंंगडे, नंदा चोरगे, नीलेश मोरे, आदर्श खाडे, संगिता साळुंखे, राहुल खरमाटे, सदाशिव खाडे, वनीता सुर्वे, स्वाती गादेकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Protest march of unorganized construction workers in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.