जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे साताऱ्यात भर पावसात आंदोलन
By नितीन काळेल | Published: November 8, 2023 07:23 PM2023-11-08T19:23:17+5:302023-11-08T19:23:56+5:30
१४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा
सातारा : राज्य सरकारी-निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने बुधवारी पावसातच जुन्या पेन्शनसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजीही झाली. तर १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नवीन पेन्शन योजनेमुळे गेली १७ वर्षे राज्यातील कर्मचारी, शिक्षक भरडले गेले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे भविष्यच उध्वस्त झालेले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. तसेच मार्च महिन्यात १७ प्रलंबित मागण्यांसाठीही संप करण्यात आला होता. त्यावेळी बैठकीत आश्वासन देण्यात आले होते. त्याला ६ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही जुन्या पेन्शनबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
तसेच शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करण्याचे धोरण जाहीर केले आहे. शैक्षणिक क्षेत्राचे खासगीकरण होताना दिसून येत आहे. आरोग्य सेवेबाबतही मनुष्यबळाचा तुटवडा आहे. तर मार्चमधील संपावेळी दिलेली आश्वासने शासनाने पाळली नाहीत. त्यामुळे राज्यातील १७ लाख कुटुंबे सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. यासाठी आता दि. १४ डिसेंबरपासून राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर जाणार आहेत.
या आंदोलनात अध्यक्ष नेताजी दिसले, सरचिटणीस अंशुमन गायकवाड, गणेश देशमुख, प्रकाश जाधव, प्रकाश घाडगे, सागर कारंडे, विशाल जाधव, संतोष आवळे, संजय खरात आदी सहभागी झाले होते.