हिंसेला विरोध करण्यासाठी साताऱ्यात भरपावसात मोर्चा
By Admin | Published: July 17, 2017 12:05 AM2017-07-17T00:05:11+5:302017-07-17T00:05:11+5:30
हिंसेला विरोध करण्यासाठीसाताऱ्यात भरपावसात मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जाती, धर्माच्या नावाखाली समाजात हिंसा पसरवली जात आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरही हल्ला करण्यात आला. वाढत्या हिंसाचाराला विरोध करण्यासाठी साताऱ्यात रविवारी दुपारी भरपावसात मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेला.
राजवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा मोती चौक, पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल परिसरात आला. यावेळी सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई हम सब भाई-भाई,’ अशी उद्घोषणा मोर्चाच्या अग्रभागी करण्यात येत होती. ‘नॉट इन माय नेम’ लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी डोक्यावर घातल्या होत्या. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणारे फलक हातात धरले होते.
यामध्ये ‘अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा धिक्कार असो’, ‘लोकशाही हवी, ‘झुंडशाही नको’, ‘मी दुखी आहे, मी असुरक्षित आहे,’ ‘आमचा हिंसेला ठाम विरोध आहे’ आदी फलक हातात धरले होते. मोर्चा शहरातून
जात असतानाच असंख्य सातारकर मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत होते.
मोर्चात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम, पतंगराव फाळके, विविध कॉलेजमधील युवक-युवती, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते, मुक्तिवादी संघटना, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे, विमा कामगार संघटना, सर्व श्रमिक संघटना, जनवादी महिला सभा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारिप बहुजन महासंघ, मुस्लीम जागृती अभियान, सातारा एजुकेशन आणि कल्चरल सोसायटी, खिदमतगाह ज्येष्ठ नागरिक संस्था, मुस्लीम मॅरेज ब्युरो कमिटी आदी सामाजिक संघटनांचा सहभाग होता.
महिला, तरुणीही सहभागी
साताऱ्यातील शांतताप्रिय नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. साताऱ्यात सकाळी चांगला पाऊस पडत असतानाही असंख्य महिला, तरुणी रेनकोट घालून तर काही छत्री घेऊन या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
हिंसेला विरोध करण्याची शपथ
शेवटी शाहीर शीतल साठे यांनी जमलेल्या सर्व नागरिकांना शपथ दिली. कुठल्याही सामूहिक हिंसाचाराचा मूक साक्षीदार अथवा भागीदार न बनण्याची व हिंसेला विरोध करण्याची ही प्रतिज्ञा होती. यानंतर मोर्चाची सांगता झाली. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.