सातारा पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद, शिवीगाळ व दमदाटीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:11 PM2018-10-29T14:11:35+5:302018-10-29T14:13:25+5:30
सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घंटागाडी चालक-मालक सहभागी झाल्याने शहरातील कचरा उचलला गेला नाही.
सातारा : सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे मुकादम दिलीप सकटे यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाच्या निषेधार्थ पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात घंटागाडी चालक-मालक सहभागी झाल्याने शहरातील कचरा उचलला गेला नाही.
सदर बझार परिसरात एक डुक्कर मृत अवस्थेत आढळून आले होते. प्रभागातील काही नागरिकांकडून याची माहिती नगरसेवक विशाल जाधव यांना मिळताच शुक्रवारी रात्री त्यांनी पालिकेचे मुकादम दिलीप सकटे यांना फोन करून ते जनावर तातडीने उचलण्याची सूचना केली होती. मात्र, घंटागाडी पंक्चर झाल्याने सकटे त्याठिकाणी गेले नव्हते.
शनिवारी दुसऱ्या दिवशी सकटे सदर बझार येथील हजेरी कार्यालयात कर्मचाऱ्यांची हजेरी घेत असताना नगरसेवक विशाल जाधव यांनी त्याठिकाणी येऊन सकटे यांनी दमदाटी व शिवीगाळ केली होती. तसेच बायोमेट्रिक मशीनची तोडफोडही केली होती.
या घटनेच्या निषेधार्थ सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी विशाल जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या घटनेला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी अखिल महाराष्ट्र कर्मचारी संघाच्या वतीने कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.
त्यानुसार सोमवारी आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी व घंटागाडी चालक-मालकांच्या वतीने घंटागाड्या बंद ठेवून कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सकाळी कोणत्याही प्रभागातील कचरा संकलित होऊ शकला नाही.