अ‍ॅट्रॉसिटी मुद्दा मांडल्यास साताऱ्यात प्रतिमोर्चा...

By admin | Published: September 30, 2016 11:58 PM2016-09-30T23:58:47+5:302016-10-01T00:18:30+5:30

अशोक गायकवाड : मराठा आरक्षणासाठी आम्ही सदैव पाठीशी; मात्र.. अशोक गायकवाड : मराठा आरक्षणासाठी आम्ही सदैव पाठीशी; मात्र..

Protesting issue of Satriti issue ... | अ‍ॅट्रॉसिटी मुद्दा मांडल्यास साताऱ्यात प्रतिमोर्चा...

अ‍ॅट्रॉसिटी मुद्दा मांडल्यास साताऱ्यात प्रतिमोर्चा...

Next

सातारा : ‘मराठा क्रांती महामोर्चाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही राहणार आहे. परंतु अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा मुद्दा महामोर्चात उपस्थित केला गेला तर आरपीआय सातारा जिल्ह्यात प्रतिमोर्चा काढणार,’ असे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शिस्तबद्ध मोर्चा काढून मराठा समाजाने एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून, मराठा समाजाला सरकारने तत्काळ आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. कित्येक वर्षांपासून ‘आरपीआय’ने मराठा आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करून आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. मंत्री रामदास आठवले तर यासाठी नेहमी आग्रही राहिले आहेत. याची नोंद मराठा समाजाने घेतली पाहिजे, असेही गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे. परंतु सध्या आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा हे दोन विषय एकत्र आणून मराठा समाजातील काही मंडळी दोन जातींमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. केवळ मताच्या राजकारणासाठी जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
वर्षानुवर्षे अन्याय, अत्याचार सहन करणारा, गाव कुसाबाहेर राहणाऱ्या मागासवर्गीय बांधवांसाठी संरक्षण कवच म्हणून या देशाच्या सर्वोच्च संसदीय कायदे मंडळाने अ‍ॅट्रॉसिटी कायदा संमत केला आहे. कायदा रद्द करून मागासवर्गीयांवर पुन्हा अन्याय, अत्याचार करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे गायकवाड यांनी पत्रकात नमूद केले आहे.
आज लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत; परंतु नेमके कोणास आरक्षण मिळाले पाहिजे, हे मोर्चाचे आयोजक का सांगत नाहीत. आरक्षण कोणास हवे आहे. मराठा समाजातील प्रस्तापितांना का विस्थापितांना, बागायतदारांना का भूमिहिनांना गरीब कष्टकऱ्यांना की सावकारांना. याचे अधिविश्लेषण मोर्चा आयोजकांनी करावे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

मोर्चाच्या सूत्रधारांनी बुद्धिभेद करू नये
आज देशातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण मंदिरे ही कोणाच्या ताब्यात आहेत. जर ती मराठा व्यवस्थेच्या ताब्यात असतील तर त्यांचे प्रथम कर्तव्य आहे की, ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचा उद्धार करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे म्हणून अशा शिक्षणसम्राटांनी आपल्या जातीचा अभिमान असेल तर आपल्या शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींना सरकारचे आरक्षण मिळण्याअगोदर शाहू महाराजांचा आदर्श घेत आपल्या शिक्षण संस्थेमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींना ५० टक्के आरक्षण घोषित करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, तरच या मराठा मोर्चाला अर्थ राहील. आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायदा या दोन वेगवेगळ्या विषयांवर मोर्चाच्या सूत्रधारांनी बुद्धिभेद करू नये, असे आवाहनही अशोक गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Protesting issue of Satriti issue ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.