वाढते खड्डे : कऱ्हाडात मुख्याधिकारी डांगेंच्या प्रतिमेस हार घालून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:56 PM2019-11-13T15:56:08+5:302019-11-13T15:57:19+5:30
कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिकाणी घडलेल्या घटनेचा अज्ञात नागरिकांनी भरलेल्या खड्ड्यावरील भरावावर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रतिमा अडकवून त्यास हार घालून निषेध व्यक्त केला.
कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिकाणी घडलेल्या घटनेचा अज्ञात नागरिकांनी भरलेल्या खड्ड्यावरील भरावावर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रतिमा अडकवून त्यास हार घालून निषेध व्यक्त केला.
कऱ्हाड शहरातील सूर्यवंशी मळा या ठिकाणी पालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनसाठी काढण्यात आलेल्या खोदकामात पडून एका वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार व पालिका प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनीही मंगळवारी रात्री केली.
जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
सूर्यवंशी मळा येथे घडलेल्या घटनेचे सोशल मीडियावरही पडसाद उमटले. दरम्यान, मंगळवारी रात्रीच्यावेळी मंगळवार पेठेतील एका खड्ड्यातील भरावावर एका अज्ञात व्यक्तीने मुख्याधिकारी डांगे यांचे छायाचित्र असलेली प्रतिमा ठेवून त्यावर पुष्पहार घातला.
ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळी पालिका आरोग्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तो बोर्ड काढून टाकला.