नीरा-देवघर व जिहे कटापूरसाठी अतिरिक्त निधी द्या : रणजितसिंह नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:36 AM2021-02-14T04:36:56+5:302021-02-14T04:36:56+5:30
फलटण : ‘महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने ठोस भूमिका घेऊन ...
फलटण : ‘महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने ठोस भूमिका घेऊन सर्वपक्षीय बैठक लावावी तसेच नीरा-देवधर व जिहे कटापूरसाठी अतिरिक्त निधी द्यावा,’ अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांचा समावेश होता.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेप्रमाणेच महाराष्ट्रातील नीरा-देवघर व जिहे-कटापूर धरणांची अपूर्ण कामे पूर्ण करावी. नीरा-देवघर धरण पूर्ण होऊन दहा ते बारा वर्षे त्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठा केला जात आहे. कालव्याची कामे अपूर्ण असल्याने या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांऐवजी सुमारे १२ टीएमसी पाणी लाभ क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दरवर्षी दिले जाते. वास्तविक लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वतःच्या जमिनी स्वखुशीने शासनाला दिल्या असताना त्यांना वंचित ठेवले जाते. संबंधित पाणी लाभ क्षेत्राला मिळाले पाहिजे, यासाठी तातडीने कालव्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी.
कोट :
महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश भाग ओलिताखाली येणार आहे. यातील बराचसा भाग माढा लोकसभा मतदार संघात येतो, म्हणूनच ही योजनादेखील पूर्ण करणे गरजेचे आहे.
- रणजितसिंह नाईक-निंबाळकर,
खासदार.