कोरोना लढ्यासाठी शशिकांत शिंदे यांच्याकडून ५० लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:35+5:302021-04-30T04:49:35+5:30
कोरेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा केंद्रस्थानी न ठेवता, ग्रामीण भागात ऑक्सिजन बेड्सचे कोरोना सेंटर उभे करण्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे ...
कोरेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा केंद्रस्थानी न
ठेवता, ग्रामीण भागात ऑक्सिजन बेड्सचे कोरोना सेंटर उभे करण्यामध्ये आमदार
शशिकांत शिंदे यांनी पावले उचलली आहेत. त्यांनी स्थानिक विकास
निधीतून त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून लवकरात
लवकर यंत्रणा उभी राहणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानाच आमदार शशिकांत
शिंदे यांनी तालुकानिहाय ऑक्सिजन बेड्सचे कोरोना सेंटर्स सुरू झाली, तर साताऱ्यावर येणारा ताण कमी होऊ शकेल, अशी
सूचना केली होती. त्याच अनुषंगाने त्यांनी सातत्याने पाठपुरावादेखील केला.
त्याचाच एक भाग म्हणून कोरेगाव (चॅलेंज अकॅडमी), खटाव, क्षेत्र माहुली,
वडूथ, अंगापूर, पुसेगाव, रायगाव (छाबडा कॉलेज), कुडाळ व बामणाली (ता. जावळी), आदी सेंटर्सवर ऑक्सिजन बेड्सचे नियोजन केले आहे. त्यासाठी लागणारे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडर्स व अन्य यंत्रसामग्रीची तरतूद केली आहे.
कोरेगाव (चॅलेंज ऍकॅडमी) येथे शंभर बेड्सचे कोरोना सेंटर खासगी वैद्यकीय
व्यावसायिकांची सेवा घेऊन चांगल्या प्रकारे चालविण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. हे सेंटर दोन दिवसांत सुरू होणार आहे. मतदारसंघात कोरोना
हॉटस्पॉट झालेल्या गावांमध्ये औषधे कीट वाटप करण्यात आले आहे. अंगापूर
येथील कोरोना सेंटर लवकरच जनतेसाठी सुरू होणार आहे. स्थानिक विकास
निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद नियोजनबद्ध पद्धतीने आमदार शिंदे यांनी केली
आहे.
चौकट :
पुसेगाव येथे स्वखर्चातून जनरेटरची सोय
पुसेगाव येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विजेचा मोठा प्रश्न असल्याचे
निदर्शनास आले आहे. तेथे तातडीने स्वखर्चातून मोठ्या क्षमतेचा जनरेटर
बसविणार असून, तो लगेचच कार्यान्वित केला जाणार आहे, अशी माहितीही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.