भजन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:31+5:302021-02-15T04:34:31+5:30
..... मेढ्यात आंदोलन मेढा : आम्ही जावळीकर संघटनेकडून सोमवार, दि. १५ सकाळी अकरा वाजता येथील वीणा चौक येथून वीज ...
.....
मेढ्यात आंदोलन
मेढा : आम्ही जावळीकर संघटनेकडून सोमवार, दि. १५ सकाळी अकरा वाजता येथील वीणा चौक येथून वीज वितरण कार्यालय येथे घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. वीज कनेक्शन तोडणे थांबवा, अन्यथा आत्महत्येला परवानगी द्या, वीज कनेक्शन तोडणे थांबवा, नाही तर लोकांच्या रोषाला सामोरे जा, अशा विविध मागण्या जावळीतील जनतेच्यावतीने ‘आम्ही जावळीकर’ संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.
......
ओढ्यावर अतिक्रमणे
सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या परिसरातील रहदारी वाढल्याने आता पालिकेने अनधिकृत बांधकामे पाडून मुख्य रस्ते मोठे करण्याची गरज आहे.
.....
पाण्याची टंचाई
खटाव : सतत भेडसावणार्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने १९७२ च्या दुष्काळात मांजरवाडी शिवारात ‘गव्हल’ आणि ‘पवारवस्ती’नजीक अशा दोन हजार तलावांची निर्मिती केली. मात्र, या तलावांना सुरुवातीपासून लागलेले गळतीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे तलाव महिन्याभरात कोरडे पडत आहे.
.........
कुत्र्यांची नसबंदी
कुडाळ : पाचगणी येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जेनी स्मित ऍनिमल वेल्फेअर ट्रस्टने केला आहे. येथील सुमारे १४० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. ही ट्रस्ट गेली दहा वर्षांपासून भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण करत आहे. पाचगणी-महाबळेश्वर परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.
...................
नागझरीत वणवा
कोरेगाव : नागझरी (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीवर भीषण वणवा लागला. कोरेगाव वनविभागाच्या सतर्कतेमुळे तो आटोक्यात आला, अन्यथा साडेनऊ हेक्टरवरील जंगलातील झाडेझुडपे व पशुपक्ष्यांचा निवारा खाद्यासह नैसर्गिक साधनसंपत्ती जळून खाक झाली असती.
......
शेतकऱ्यांमध्ये समाधान
वाई : वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केटमध्ये नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. हळद लिलावाचा प्रारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हळदीला प्रतिक्विंटल पंधरा हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला.
...............
मोबाइल चोरटे सक्रिय
वाई : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाइल चोरटे सक्रीय झाले आहेत. शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, सध्या भाजीमंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतूनच मोबाइलविना घरी परतावे लागत आहे.
.....
ठिकठिकाणी उघड्या डीपी
सातारा : शहरात वीजवाहिन्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. बहुतांशी गावांमधील शिवारात लोखंडी खांब असून, वीजवाहिन्या लोंबकळत्या स्थितीत धोकादायक बनल्या आहेत. काही ठिकाणी डीपी उघड्यावर असून, दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जिवाचा कोंडमारा होत आहे.
.................
वाहतुकीची कोंडी
सातारा : येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्याने दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चारनंतर या रस्त्यावरून चारचाकी वाहनांच्या रहदारीस बंदी घालण्यात आली आहे.
...............
वाहनचालक त्रस्त
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर आनेवाडी येथील टोल नाक्यावर फास्टॅग असूनही वाहन कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. व्यवस्थापन मात्र निष्काळजी दिसत आहे. वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. फास्टॅक यंत्रणा सुरळीत सुरू करण्याची मागणी वाहनचालक म्हणून होत आहे.
..........................................
घाट रस्ते धोकादायक
सातारा : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढली असून, अरुंद घाट रस्त्यांवर अधून-मधून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार, सज्जनगड, यवतेश्वर, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी घाट मार्गांतून जावे लागते.
.........
वन्यप्राण्यांचा संचार वाढला
सातारा : लॉकडाऊनमध्ये मानवाचा वावर कमी झाल्याने पशुपक्षी व वन्यजीवांचा वावर वाढला होता. रस्त्यांवर वाहनांची संख्या रोडावली आणि पशुपक्षी व वन्यजीव मुक्तसंचार करत होते. मात्र आता स्थिती पूर्वपदावर झाली असून, नागरिकांची गर्दी वाढली आहे. वन्यजीवांचा मानवी वस्त्यांमध्ये संचार वाढला आहे.
.........
सोशल डिस्टन्सचा फज्जा
सातारा : कोरोना व लोकांच्या गर्दीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारी ओढवली होती. डिसेंबरमध्ये सर्व क्षेत्र खुली झाली आहेत. वर्षअखेरीस तीनचाकी रिक्षा, ट्रॅक्समधून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ग्रामीण भागात एसटीच्या ठरावीक फेऱ्या होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.