वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:39 AM2021-04-21T04:39:02+5:302021-04-21T04:39:02+5:30
वेळे : दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळे येथे १ मेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायतीमार्फत ...
वेळे : दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळे येथे १ मेपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली आहे.
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावल्याने मदत होईल, अशी आशा वेळे ग्रामस्थांना आहे. वेळे येथे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३० आहे. त्यामुळेच येथील ग्रामपंचायत प्रशासनाने उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेतल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
१ मेपर्यंत कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. ज्या घरामध्ये कोरोना रुग्ण आहेत किंवा ज्यांना गृह विलगीकरण करण्यात आले आहे अशा रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी अजिबात गर्दी करू नये. एकत्र जमून कोणतेही खेळ खेळू नयेत. तसेच परगावाहून आलेल्यांनी स्वतःहून आपली नावे ग्रामपंचायतीमध्ये नोंद करावीत. ज्या लोकांना काही संशयास्पद व्यक्ती आढळतील अशांनी त्वरित ग्रामपंचायतीस संपर्क करून त्यांची नावे सांगावीत, असे आवाहन वेळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले.
या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरू राहतील. तसेच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व विनामास्क फिरताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतीस सहकार्य करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करून सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामसेवक हिंदूराव डेरे यांनी केले आहे.