वडूज येथे कोरोना आढावा न घेतल्याने जनतेचा अपेक्षाभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:04+5:302021-06-11T04:27:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात वाढती बाधित रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी यांनी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या एकमेव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यात वाढती बाधित रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी यांनी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या एकमेव नगरपंचायत वडूज शहरात असताना आणि वडूज ग्रामीण रुग्णालयाकडे न जाता इतर ठिकाणी भेटी दिल्या, तसेच वास्तविक पाहता वडूज तहसील कार्यालयात तालुक्याचा कोरोना आढावा घेणे क्रमप्राप्त होते. तसे न झाल्याने जनतेचा अपेक्षाभंग झाला असल्याचे मत नगरसेवक अनिल माळी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सातेवाडी येथे जाऊन निवेदन दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खादी ग्रामोद्योगचे चेअरमन परेश जाधव, विक्रम रोमण, दीपक बोडरे आदींची उपस्थिती होती.
नगरसेवक माळी पुढे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी तालुक्याचे व पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या वडूज शहराचे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियोजन बैठक होणे अपेक्षित होते, तसेच प्रामुख्याने वडूज ग्रामीण रुग्णालयातील अनेक समस्यांचे जिल्हाधिकारी निरसन करतील, अशी आशा होती. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर, वाढीव तीस ऑक्सिजन बेडची मागणी, पुरेसा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि औषधसाठा उपलब्धतेबाबत समस्या यांसह इमारतीचे फायर ऑडिट व अन्य तांत्रिक बाबी सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी अडचणी निर्माण होत आहेत. शहराची व परिसराची लोकसंख्या पाहता व बाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता याठिकाणी सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे व्यावसायिक तसेच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच बँका, खासगी फायनान्स कंपन्या व महिला बचत गट यांनी कर्जदारांना नोटीस काढून कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे.
जिल्हाधिकारी यांनी खटाव तालुक्यातील कोरोना काळातील प्रशासकीय खर्चासाठी कोविड निधीची स्वतंत्र तरतूद करावी, तसेच बँका व फायनान्स कंपन्यांना आणि बचत गटांना सदर कारवाई करण्यापासून रोखावे व कर्जदारांना मुदतवाढ करण्यासाठी संबंधिताना सूचना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक अनिल माळी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
फोटो : सातेवाडी ता. खटाव येथील होम आयसोलेशनवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा करताना वडूजचे नगरसेवक अनिल माळी, परेश जाधव व इतर. ( शेखर जाधव )