अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना जनतेचे पाठबळ!
By admin | Published: November 21, 2014 09:38 PM2014-11-21T21:38:40+5:302014-11-22T00:10:28+5:30
साद-प्रतिसाद : जिल्हा परिषदेतील सर्वच अधिकाऱ्यांनी घेतले एक-एक गाव दत्तक-- जिल्हा परिषदेतून
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पाहिले आहे. त्यांनी दिलेल्या सादेला सातारकरांनी प्रतिसाद दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्यापासून सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक-एक गाव दत्तक घेतले आहेत. यामध्ये गुरुवारी या अधिकाऱ्यांनी आपापल्या गावांना भेटी दिल्या. त्यांना ग्रामस्थांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
निर्मलग्राम योजनेत सातारा जिल्ह्याने यापूर्वी राज्यात ठसा उमठविला होता. दरम्यानच्या काळात यामध्ये खंड पडला. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ९१३ कुटुंबांकडे आजही शौचालय नाही. मोजक्या लोकांमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकाला बट्टा लागू नये, म्हणून साडेदहा हजार पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी गाव दत्तक घेतले आहेत. यामध्ये दहा हजार ६९६ अधिकारी, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. कुटुंबांना भेटी देऊन शौचालय बांधणीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. नऊ कुटुंबे दत्तक घेऊन दि. २६ जानेवारीपर्यंत स्वच्छतागृह बांधण्याबाबत पुढकार घेण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी दत्तक घेतलेल्या शिवथरला भेट दिली. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला. गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी थेट भावनेलाच हात घातला. त्या ठिकाणी आलेल्या तरुणाकडे स्मार्ट फोन होता. त्याला त्यांनी विचारले, ‘तुमच्याकडे बारा-पंधरा हजारांचा मोबाईल आहे, त्यामध्ये दर महिन्याला चार-पाचशे रुपयांचा बॅलन्स टाकला जातो. मात्र, घरात बारा हजारांचे स्वच्छतागृह नाही. आपली गृहलक्ष्मी, पै-पाहुणे नैसर्गिक विधीसाठी बाहेर पाठविणे योग्य नाही. त्यामुळे आपलेच नाव जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला घरात स्वच्छतागृह तयार करावे.’ त्यांच्या भावनिक आवाहनाला ग्रामस्थांनी सकारात्मक पाठिंबा दिला आहे. स्वच्छतागृह बांधण्याची तयारी दाखविली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी स्वत:चेच गाव असलेले दुधेबावी, ता. फलटण हे गाव निवडले आहे. त्यामागे त्यांचा हेतू सकारात्मक आहे. आपलेच गाव असल्याने या गावाकडे जास्त लक्ष देता येणार आहे. गावातील लोकांचा स्वभाव माहिती आहे. त्यांच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न आहे, तो स्वच्छतागृह होईल; पण पाणीच नसल्याने करायचे काय? यावर त्यांनी पथदर्शी उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या ठिकाणी हौद बांधला तर त्यात कमीत कमी खर्चातून बारमाही पाणी पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिवदास यांनी भुर्इंज गाव दत्तक घेतले आहे. गावात २४९ घरांत स्वच्छतागृह नाही. त्यांनी गावातील सरपंच, उपसरपंचांना हाताशी धरून मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. त्याला त्यांनीही सकारात्मक पाठिंबा दिला आहे. २५ घरांत स्वच्छतागृह तयार करण्याचे उद्दिष्ठ असताना २६ जानेवारीपूर्वी किमान शंभर घरांत स्वच्छतागृह बांधून देण्याचा पण त्यांनी केला आहे. यासाठी शिवदास यांनी आठवड्यात एक दिवस भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वच्छतागृह बांधण्यासाठी शासनाकडून गरिबांना साडेबारा हजारांचे अनुदान मिळणार आहे. मात्र, हे अनुदान स्वच्छतागृह बांधून झाल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे खरोखरच गरीब असलेल्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने नियमित पाहणी करून टप्प्याटप्प्याने अनुदान मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. (प्रतिनिधी)
दु:ख बाजूला ठेवून साधला संवाद
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी उंब्रज हे गाव दत्तक घेतले आहे. त्यांना पहिल्याच दिवशी आलेला अनुभव अंगावर काटा आणणारा होता. ते गुरुवारी सकाळी उंब्रजमध्ये गेले, तर तेथे त्यांना वाईट बातमी ऐकायला मिळाली. गावातील एका नागरिकाचे निधन झाले असून, सावडणेचा विधीला ग्रामस्थ जमले होते. डॉ. माने त्या ठिकाणी गेले. त्यातील काहीना बाजूला घेऊन ‘नागरिकांशी आपण येथे काही वेळ बोलले तर चालेल का?’ अशी विनंती केली. यावेळी नातेवाइकांनीही दु:खी अवस्थेतही सरकारी कामात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. अन् त्याचठिकाणी डॉ. माने यांनी या मोहिमेची माहिती दिली. उंब्रजकरांनी दु:ख बाजूला ठेवून दिलेल्या सहकार्याला सलामच करायला हवा.