स्वत:च्या राहत्या घराला दिलं सार्वजनिक वाचनालयाचं रूप

By admin | Published: May 4, 2016 10:37 PM2016-05-04T22:37:32+5:302016-05-05T00:02:47+5:30

खेड्यातही वाचनसंस्कृती : वरकुटे मलवडी येथील पिसे बंधुंचा प्रयत्न

The public library of his own residence has been given | स्वत:च्या राहत्या घराला दिलं सार्वजनिक वाचनालयाचं रूप

स्वत:च्या राहत्या घराला दिलं सार्वजनिक वाचनालयाचं रूप

Next

वरकुटे मलवडी : वरकुटे मलवडी गावात आपल्या स्वत:च्या राहत्या घरातच राज पिसे आणि विजय पिसे या दोन उद्योजक बंधूनी मोफत वसंत वाचनालय आणि डिजीटल लायब्ररी सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यात एक अद्यायावत डिजिटल लायब्ररी निर्माण करून गावच्या विकासात मोलाचे कार्य उभे केले आहे. या वाचनालयात ५ हजार पुस्तके, २५ हजार डिजिटल पुस्तके आणि एक कोटी आॅनलाइन पुस्तके, ग्रंथ, कादंबऱ्या आदि साहित्य वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
वेळोवेळी होणार्या शासकीय निमशासकिय नोकर भरती विषयी तरूणांना माहीती दिली जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी पशुपालन कुकुटपालन, शेळीपालन यासारख्या शेतीपूरक व्यवसायांची सखोल माहिती आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच खास महिलांसाठी इंग्लिश स्पीकींग कोर्सचे मोफत नियोजन केले आहे. परिसरातील बालवाडीच्या मुलांपासून महाविद्यालयीन विद्याथ्यार्साठी सर्व सोयींनी युक्त असे वाचनालय पिसे बंधूंनी सुरू केले आहे.
त्यांचे वडील वसंत पिसे हे प्राथमिक शिक्षक होते. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत पुण्याला राहणे पसंत केले. त्यानंतर वरकुटे येथील घराचं काय करायचं म्हणून त्यांनी आपल्या घरालाच गावाच्या हितासाठी वाचनालयाचं रूप दिलं. समाजातील गोरगरीब व गरजू तरूणांना याचा लाभ होत आहे. स्पर्धेच्या युगात स्वत:ला घडवताना महागड्या पुस्तकाविना काही तरूणांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येत नाही. अशा सर्वसामान्य युवकांसाठी हे वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. (वार्ताहर)

वरकुटे मलवडीमध्ये अनेक वर्षापासून वाचनालये केवळ अनुदान लाटण्यासाठी अस्तित्वात आहेत. अशा वाचनालयांचा आजपर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही; परंतु पिसे बांधवांनी हे मोफत वाचनालय व डिजिटल लायब्ररी निर्माण करून गरजू तरूणांचं हित जोपासलं आहे.
- दत्तात्रय सोनवणे, --सेवानिवृत्त पोलिस अधिकारी

ग्रामीण भागात अशी अद्ययावत लायब्ररी निर्माण होणं हे खरोखरच गावाच्या भूषणावह आहे. विद्यार्थ्यांनी या मोफत वाचनालयाचा लाभ घ्यावा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. युवकांना ही एक संधी निर्माण करून दिली आहे.
- मारूती खरात, उद्योजक

Web Title: The public library of his own residence has been given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.