कोरोनाकाळात लोकप्रतिनिधींवर जनतेचा कटाक्ष...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:37+5:302021-05-25T04:43:37+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. दररोज दीडशेच्या जवळपास लोक बाधित सापडत आहेत. रुग्णांना ...

Public opinion on people's representatives in Corona period ... | कोरोनाकाळात लोकप्रतिनिधींवर जनतेचा कटाक्ष...

कोरोनाकाळात लोकप्रतिनिधींवर जनतेचा कटाक्ष...

googlenewsNext

खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. दररोज दीडशेच्या जवळपास लोक बाधित सापडत आहेत. रुग्णांना बेड्स, उपचार, ऑक्सिजन सिलिंडर्स आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळेनाशी झाली आहेत. या आणीबाणीच्या काळात लोकप्रतिनिधी जनतेसाठी किती तळमळीने काम करीत आहेत, याकडे जनतेचा कटाक्ष आहे. कोण मैदानात उतरून कोरोना विरुद्धची जीवन-मरणाची लढाई लढतोय, कुणाचे दुरून डोंगर साजरे चाललेत, अशा अनेक बाबींचा तालुक्यातील जनतेने हिशेब ठेवला आहे. वेळ आल्यावर हा हिशेब चुकताही केला जाणार असल्याची चाहूल लागली असल्याने काहींनी हातपाय हलवायला सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन सुरू होता तेव्हा खंडाळा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अगदी थोडकी असायची. लॉकडाऊन उठताच लोकांच्या येण्या-जाण्याने तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले. बाधितांचे आकडे वाढायला लागल्यावर तालुक्यात रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेबरोबरच काही थोड्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. तर अनेकांनी जनतेला वाऱ्यावर सोडून घरातील सुरक्षित वातावरणात थांबणे पसंत केले. आता कोरोनाची महाभयंकर दुसरी लाट सुरू असतानाचे चित्र तसेच दिसत आहे. खंडाळ्याच्या जनतेने आपल्यासाठी कोण-कोण आणि काय-काय करते, यावर चांगलेच लक्ष ठेवले आहे. गतवर्षी कोरोनाची पहिली लाट येताच काहींनी शासनाच्या सहकार्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदतीचा पहिला हात पुढे केला. हजारावर रुग्णांना त्यांच्याकडे यशस्वी उपचार मिळाले. दुसऱ्या लाटेत शासनाच्या मदतीवर कोरोनाबाधितांची रुग्णसेवा सुरूच आहे.

ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्णांवर उपचार करणारे केंद्र म्हणून ग्रामीण रुग्णालयाचा उल्लेख होत आहे. काही लोकप्रतिनिधी तर गेल्या वर्षीपासून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सहकुटुंब झटत आहेत. दुसऱ्या लाटेतही त्यांची रुग्णसेवा सुरूच आहे. निवडणुकांच्या काळात अनेक राजकारण्यांचे पीक जोमात येते, त्यातील बरेच हंगामी राजकारणी सध्याच्या संकट काळात ठरवून गायब झाले आहेत. काहींनी उशिरा का होईना हातपाय हलवायला सुरुवात केली आहे.

तालुक्याबाहेर उपचार घेणाऱ्या सातारा-पुणेपर्यंतच्या तालुकावासीयांना लागेल ती मदत कोण करतोय यावर जसे जनतेने लक्ष ठेवले आहे तसेच निवडणुकांवेळी प्रसिद्धीचा स्टंट करणारे मात्र कोरोना संकट काळात दडी मारून बसलेले यांच्यावरही वॉच ठेवला आहे. प्रत्यक्ष मदत करायची सोडून कोण फक्त देखावा करतोय, आपल्याच कार्यकर्त्यांना कोण वाऱ्यावर सोडतोय, चार-दोन कार्यकर्त्यांच्या मदतीने सोशल मीडियावर बागुलबुवा कोण उभा करतोय याचा हिशेब जनतेने ठेवला आहे. वेळ आल्यावर सगळा हिशेब चुकता करायची तयारी जनतेने केली आहे. जीवन-मरणाच्या लढाईत कोण आपले आणि कोण परके हे जनतेने चांगलेच ओळखले आहे.

चौकट..

मदत करणाऱ्यांचे स्थान जनतेच्या हृदयात...

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना मदत करणाऱ्यांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळविलेले आहे. त्यासाठी त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्या कुटुंबावर कोरोनाचे संकट आले त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपल्याला कुणी आणि किती मदत केली, मरणाच्या दाढेतून आपल्याला कुणी बाहेर काढले हे चांगले माहीत आहे. त्यामुळे मैदानात उतरून जे राजकारणी कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत त्यांना जनता कधीच विसरणार नाही. त्यांनी केलेल्या कामाची पोहोचपावती भविष्यात नक्कीच मिळणार आहे.

चौकट..

कठीण काळात मरणयातना सहन...

खंडाळा औद्योगिक वसाहतीवर अनेकांची पोटपूजा सुरू आहे. पण, ज्यांच्या योगदानावर हे उभे राहिले त्यांनाच या कठीण काळात मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यासाठी काहींनी आंदोलन करून खंत व्यक्त केली तर काहींनी कागदी निवेदने देऊन जाब विचारला; पण त्यानंतर प्रत्यक्ष लोकांना मदत करताना फारच थोडे दिसून येत आहेत. गावपातळीवर गावनेते मात्र ग्रामस्थांच्या काळजीने जमेल तेवढे करताना पाहायला मिळत आहे.

Web Title: Public opinion on people's representatives in Corona period ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.