सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम । गावोगावी वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:38 PM2020-02-08T23:38:20+5:302020-02-08T23:40:36+5:30

पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते.

Public salute to retired soldiers | सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम । गावोगावी वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत

सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम । गावोगावी वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देदेशाभिमान जागृत

दत्ता यादव ।
सातारा : सैन्य दलातील जवानांप्रती लोकांमध्ये आत्मीयता वाढत असून, देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या सैनिकांना जनताच आता सॅल्यूट ठोकत आहे. आख्खं गाव सेवानिवृत्त सैनिकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असून, कोणी घोड्यावर तर कोणी अश्वरथामध्ये बसवून सैनिकांची वाजत-गाजत मिरवणूक काढत आहे. हे चित्र अलीकडे अनेक ठिकाणी पाहायला मिळत असून, लोकांमध्ये देशाभिमानही जागृत होत आहे.

सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागायत सुरूच ठेवली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातून सैन्य दलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मिल्ट्री अपशिंगे हे गाव केवळ त्या गावातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्य दलात भरती होत असल्यामुळे त्या गावाला मिल्ट्री अपशिंगे असे संबोधले जाते. मात्र, आता ही परिस्थिती राहिली नाही. मिल्ट्री अपशिंगेसारखी अनेक गावे आता सैनिकांची म्हणून ओळखू लागली आहेत. एका-एका गावात दोनशे ते चारशे युवक सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यामुळे जवानांबद्दल समाजात आदर आणि सहानुभूतीही निर्माण होत आहे.

पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते. ज्या दिवशी सेवा संपवून सैनिक गावात येतात. त्या दिवशी गावातील सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत.

सेवानिवृत्त सैनिकांना घोड्यावर तर कोणी उघड्या जीपमधून जवानांची गावातून वाजत-गाजत फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढत आहे. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने जवानांचे स्वागत करण्याची परंपरा आता गावोगावी सुरू झाली आहे. यामुळे तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

आपल्या स्वागतासाठी जनतेकडून आपुलकी आणि भावना अशा प्रकारे व्यक्त होत असल्याचे पाहून अनेक जवान भारावून जात आहेत. तर अनेक जवानांना अश्रूही आवरता येत नाहीत. ‘भारत माता की जय,’चा गजर करत जनतेमधून देशाभिमान जागृत केला जात आहे. अशा प्रकारे कोणत्याही नोकरीतून एखादा सेवानिवृत्त झाला तर त्याचे स्वागत होत नसते. मात्र, याला सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान अपवाद ठरले आहेत.


थरारक अनुभवातून डबडबतायत डोळे..
सैन्य दलातून जवान निवृत्त झाल्यानंतर त्यांचा गावागावांत आणि शाळांमध्ये सन्मापूर्वक गौरव होत आहे. यावेळी जवानांना देशसेवेतील आपले अनुभव कसे होते, याबाबत बोलण्यास सांगितले जाते. त्यावेळी जवानांकडून सांगितलेले थरारक अनुभव ऐकून अनेकांचे डोळे पाणावून जातात. सोबत असलेल्या शहीद जवानांच्या आठवणीने व्याकूळ झालेले सेवा निवृत्त जवानही आठवणींना उजाळा देऊन यावेळी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देताना दिसत आहेत.


क-हाड येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्यावतीने बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी-पुणे येथून सेवानिवृत्त झालेल्या जवानांची घोड्यांवरून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Public salute to retired soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.