राजकीय गुंडगिरीच्या विरोधात जनता रस्त्यावर
By admin | Published: June 16, 2015 10:26 PM2015-06-16T22:26:39+5:302015-06-17T00:40:19+5:30
धिंड प्रकरण : महाबळेश्वरात शिक्षकांचा मूकमोर्चा ; गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
महाबळेश्वर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक कुमार शिंदे व त्यांचे बंधू योगेश शिंदे यांनी जमाव जमवून दोन मुख्याध्यापकांच्या तोंडाला शाई फासून सोमवारी मारहाण केली होती. तसेच संबंधित मुख्याध्यापकांची बाजारपेठेतून धिंड काढली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज पालिका शिक्षक संघाच्या वतीने शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेनेसह अनेक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापुरुषांची प्रतिमा अडगळीत ठेवल्याच्या कारणावरून सोमवारी नगरसेवक कुमार शिंदे, योगेश शिंदे यांसह पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी येथील प्राथमिक शाळेत घुसून दोन मुुख्याध्यापकांच्या तोंडाला काळे फासले होते. तसेच दोन्ही मुख्याध्यापकांना मारहाण करीत व कपडे फाडून त्यांनी बाजारपेठेतून धींड काढण्यात आली होती. यानंतर जमावाने पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून प्राध्यापकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. यावेळी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते.
शिक्षकांना मारहाण केल्याच्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करून तसेच शिंदे यांच्या दहशतीविरुद्ध शहरातील व्यापाऱ्यांनी सोमवारी रात्री बैठकीचे आयोजन करून निषेध व्यक्त केला. दरम्यान, मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ येथील प्राथमिक शाळेत तालुक्यातील शिक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीत या घटनेचा एकमुखी निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर शिक्षक संघाच्या वतीने शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला. तोंडाला काळी पट्टी बांधून शिक्षक व नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चा पोलीस ठाण्यावर आल्यानंतर संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर मोर्चा पालिकेवर गेला. मात्र, पालिकेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडविला. यावैळी शिवसेने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून पालिका परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी झालेल्या गोंधळानंतर मुख्याधिकारी सचिन पवार निवेदन स्वीकारण्यासाठी पालिकेबाहेर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या राजेश कुंभारदरे यांनी जमावाला शांत केले. मुख्याधिकारी पवार यांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करीत नगरसेवकाने पालिका आवारात केलेल्या गैरवर्तनाचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
मोर्चात शिक्षकांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
आरपीआय, चर्मकार संघटनेतर्फे निषेध
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून ‘आरपीआय’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश रावखंडे कार्यकर्त्यांसह महाबळेश्वर येथे दाखल झाले. नगरसेवक कुमार शिंदे यांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करीत मागासर्गीयांमध्ये दरी निर्माण होवू नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यांनतर गायकवाड व रावखंडे यांनी पालिकेत जावून नगराध्यक्ष उज्ज्वला तोष्णीवाल व उपनगराध्यक्ष संतोष शिंदे यांची भेट घेतली. या दोन्ही कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो नव्हते. हे चित्र पाहून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यालयात महापुरुषांचे फोटो तत्काळ न लावल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. यानंतर नगराध्यक्ष तोष्णीवाल यांनी महापुरुषांचे फोटो तत्काळ लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.