कडधान्यानं मारलं; शेतकऱ्यांना भातानं तारलं; मल्हारपेठ परिसरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:22 PM2018-09-07T23:22:57+5:302018-09-07T23:23:02+5:30
मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके अतिपावसाने वाया गेली आहेत. पावसाने पिके कुचंबली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडझाप सुरू केल्यामुळे थोडे फार उत्पन्न मिळेल, असा प्रकारच्या आशा शेतकºयांमध्ये निर्माण झाल्या आहेत.
शेतात घातलेला खर्च तरी निघेल, या आशेने शेतकरी वर्गातून रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर औषध फवारणीसह विविध उपाय केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतीतून उत्पन्न मिळविण्याची धडपड शेतकºयांतून होत असल्याचे चित्र सध्या पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.
चालूवर्षी पाटण तालुक्यात वेळेवर जून महिन्यात पावसाने सुरुवात केली. कशाबशा शेतकºयांनी पेरण्या केल्या. सुरुवातीस झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अक्षरश: शेतकºयांना शेती मशागतीचीही कामे करता आली नाही. सततच्या पावसामुळे शिवारात पिकांभोवती तणाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला आहे. तर भुईमुगाच्या आरा टोचणीची अवस्था असून, सरीवर असणाºया भुईमुगास मोठा मार बसला आहे.
चालूवर्षी जादा पावसामुळे भाताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून, सर्वात जास्त उत्पन्न भात करणाºया भात उत्पादक शेतकºयांना मिळेल, अशी अशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हवामानातल्या बदलामुळे तांबेरा अशा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नदीकाठी पाण्याची सोय असल्याने आडसाली लागणी होतात.
चालू वर्षी भात उत्पादक शेतकºयांना फायदा
सोयाबीन, भुईमूग व कडधान्य करणाºया शेतकºयांची पिके कुचंबली असली तरी जादा पावसाचा फायदा पेरणी व रोप केलेल्या भातांना झाला असल्याने कंबरेच्या वर भात पिके आहेत. चालू वर्षी इतर पिकांच्या तुलनेत पेरणी व रोपभात केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मत अनेक शेतकºयांनी व्यक्त केले.