अवकाळीमुळे पंचनाम्यांचाही ‘पाऊस’!

By admin | Published: March 2, 2015 11:39 PM2015-03-02T23:39:58+5:302015-03-03T00:26:50+5:30

निसर्गाचा कहर : शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या शिवारात; प्रस्तावित नुकसान भरपाई मिळेना तोवरच नवीन संकटाचा घाला

Punchamaniya 'rain' due to the dawn! | अवकाळीमुळे पंचनाम्यांचाही ‘पाऊस’!

अवकाळीमुळे पंचनाम्यांचाही ‘पाऊस’!

Next

सातारा : अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. शेतकरी काबाडकष्ट करुन पिकांचे उत्पादन घेतात; परंतु ऐन काढणीच्या वेळी अथवा शेतकऱ्यांच्या हातात पैसा येण्याच्या वेळीच पाऊस कहर करत आहे. गतवर्षी पावसाळ्याव्यतिरिक्त तीन महिने अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतीचे नुकसान केले. शासन दरबारी नुकसान भरपाईचा निधी मागितला गेला असला तरी तो अद्याप एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नसताना यावर्षी पुन्हा एकदा अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. अवकाळीत केवळ पंचनाम्यांचा ‘पाऊस’ पडतो. मदत मात्र मिळत नाही.
उन्हाळ्याची चाहूल नुकतीच लागली असताना सलग दोन दिवस अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांसोबतच आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब, द्राक्षे, पपई या फळ पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणामध्ये फळबाज्या केल्या जातात. या फळबाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातले शेतकरी पुरते हादरुन गेले आहेत. ज्वारी, गव्हाच्या मळण्याही अद्याप रखडल्या आहेत. शेतात काढून टाकलेली पिके पावसाने भिजली आहेत. अजूनही पावसाचे चिन्ह कायम असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, गतवर्षी मे, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचा अहवाल शासन दरबारी पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने एक रुपयाही दिला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आता पुन्हा अवकाळी पावसाने सुरुवात केली असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु झाले आहेत.
त्यापैकी जावळी, वाई, महाबळेश्वर या तीन तालुक्यांती पंचनाम्यांचे अंदाजित अहवाल महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांती ३७८ शेतकऱ्यांच्या २७१.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. इतर तालुक्यांतही पंचनामे सुरु आहेत.
मे २0१४ : बाधित शेतकरी ८८५, क्षेत्र २२३.६९ हेक्टर , नुकसान ५0.३९ लाख. जुलै २0१४ : बाधित शेतकरी १६, क्षेत्र ४.४ हेक्टर, नुकसान ६0 हजार. नोव्हेंबर २0१४ : बाधित शेतकरी १३३, क्षेत्र ४५.२७ हेक्टर, नुकसान १0.४६ लाख. डिसेंबर २0१४ : बाधित शेतकरी २,८३९, क्षेत्र ४४६.६४ हेक्टर, नुकसान ६७.३५ हजार.
या नुकसानीमुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदील झाला आहे. नुकसानीचे लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

खंडाळ्यात ५० लाखांचे नुकसान
खंडाळा : खंडाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वत्रच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. वर्षभरात तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आडवी झाली. शिवारातील उभ्या पिकावरच आभाळ कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खंडाळा तालुक्यातील सुमारे २३० हेक्टर क्षेत्रातील तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पण तरीही शेतकरी पुन्हा नव्या दमाने पाठीचा कणा ताठ करून काळ्या आईच्या सेवेत रममाण झालेला पाहायला मिळत आहे.



आदर्कीत नुकसानीचे पंचनामे
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या आदर्कीसह परिसरात शनिवार, रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा ही पिके भुईसपाट झाली. रब्बी हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी आदर्कीसह परिसरात नुकसानीचा पंचनामा केला.


कोरगावात १०५० शेतकऱ्यांवर संकट
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात एकूण ६८ गावे आहेत. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सुमारे ४५० हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा तडाखा बसला असून १ हजार ५० शेतकरी बाधित झाले आहेत. ज्वारीचे ३५० हेक्टर, हरभरा ५५, द्राक्षे, १५ आंबा ५ तर डाळींबाचे पाच हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

Web Title: Punchamaniya 'rain' due to the dawn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.