पुणे महानगरपालिकेकडून सातारकरांच्या प्रकृतीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:50+5:302021-04-14T04:35:50+5:30
सातारा : सर्वच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे. सातारा शेजारील पुणे ...
सातारा : सर्वच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे. सातारा शेजारील पुणे जिल्ह्यात एक लाख दहा हजारांहून अधिक रुग्ण बाधित आढळले आहेत. यातून सावरण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्न करत असतानाच शेजारधर्म निभावत आहे. पुणे महानगरपालिकेकडून मोबाईल फोन करून विविध प्रश्नांच्या माध्यमातून सातारकरांच्या प्रकृतीची चौकशी केली जात आहे.
सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांचे नेहमीच सख्य राहिलेले आहे. साताऱ्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक तरी शिक्षण, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेला आहे. पुणे विभागीय आरोग्य उपसंचालकपदाची जबाबदारी साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांचे पती संज्योत कदम यांच्याकडे आलेली आहे. साताऱ्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून माधवी कदम प्रयत्न करत असून, पुणे विभागीयस्तरावरून संज्योत कदम यांचेही साताऱ्याकडे विशेष लक्ष आहे. साताऱ्यातील एखाद्या कुटुंबातील व्यक्तिला कोरोना झाला तर थेट आरोग्य उपसंचालकांना हक्काने फोन करून ''साहेब आम्हाला एका बेडची सोय झाली तर बरं होईल'' असे हक्काने सांगितले जात आहे.
कोरोना चाचणीसाठी आलेल्या व्यक्तिचा मोबाईल नंबर जिल्हा रुग्णालयात घेतला जातो. अहवाल बाधित आला तर मोबाईलवरून संबंधित व्यक्तिला आपण पॉझिटिव्ह असल्याचा निरोप पाठविला जातो. त्यानंतर काही वेळानंतर आपले नाव सिस्टीमला अपडेट केले जाते. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून प्रांताधिकारी कार्यालयाकडून संबंधित बाधित व्यक्तिला फोन केला जातो. यामध्ये त्रास काय होत आहे, सध्या कोठे उपचार सुरू आहेत, याबद्दल विचारणा केली जाते. त्यानंतर काही दिवसांनी सातारा पालिकेच्या कस्तुरबा गांधी आरोग्य केंद्रातून संबंधीत व्यक्तिला फोन करून पुन्हा कोठे उपचार घेत आहात किंवा गृह विलगीकरण झालेले आहात का, याची विचारणा केली जाते. हे दूरध्वनी साताऱ्यातील सर्वच रुग्णांना येत असले तरी काही रुग्णांना मात्र पुणे महानगरपालिकेकडून मोबाईल केला जातो. पाच ते सहा प्रश्नांची उत्तरे मिळवून आजार किती गंभीर आहे, हे सांगितले जाते. पुणे शहरातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित असताना शेजारील साताऱ्यातील रुग्णांच्या होत असलेल्या चौकशीमुळे कौतुक व्यक्त केले जात आहे.
चौकट
खोकला येत असल्यास एक दाबा
पुणे महानगरपालिका येथून येत असलेल्या दूरध्वनीवर कोणीही कर्मचारी बोलत नसून हा संगणकीय मेसेज असतो. यामध्ये रुग्णाला अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असल्यास एक किंवा दोन नंबरचे बटन दाबायचे असते. यामध्ये तुम्हाला खोकला येत आहे का, तुमची ऑक्सिजन पातळी ९५पेक्षा खाली आहे का, तुम्हाला ताप जाणवतोय का, जुलाबाचा त्रास होतोय का... या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात.
लवकरच डॉक्टर संपर्क साधतील....
गृह विलगीकरण झालेल्या रुग्णांकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार आजार किती गंभीर स्वरूपाचा आहे, हे सांगितले जाते. तसेच ''लवकरच तुम्हाला डॉक्टर संपर्क साधतील,'' असा दिलासाही दिला जातो. मात्र, रुग्ण साताऱ्यात असल्याने कुठलेच वैद्यकीय अधिकारी संपर्क साधत नाहीत.