पुणेकरांनी वाढविली सातारकरांची चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:36+5:302021-03-27T04:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, पुणे हे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, पुणे हे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागले आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण व लॉकडाऊनच्या भीतीमुळे नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्यात राहणारे सातारकर पुन्हा घराकडे परतू लागले आहेत. येणाऱ्या नागरिकांवर कोणतेच निर्बंध नसल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अन् चिंता दोन्हीतही भर पडत चालली आहे.
जानेवारी व फेब्रुवारी हे दोन महिने जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण पूर्णतः नियंत्रणात होते. परंतु, मार्च महिना सुरू झाल्यापासून कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. बाधितांमध्ये दररोज अडीचशे ते तीनशे रुग्णांची भर पडत असून गेल्या २६ दिवसांत सुमारे तीन हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून तर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. त्यामुळे घरवापसी करणाऱ्या व कामकाजानिमित्त जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
सध्या साताऱ्यापासून १२० किलोमीटर अंतरावर असलेले पुणे हे शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहे. पुणे जिल्ह्यात दररोज साडेतीन ते पाच हजार रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसरीकडे लॉकडाऊनची धास्ती असे दुहेरी संकट उभे राहिल्याने अनेकांची घरवापसी सुरू झाली आहे.
साताऱ्यातून पुण्यात कामकाजानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. अनेक जण तेथे स्थायिकही झाले आहेत. लॉकडाऊन लागला तर गतवर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या भीतीने पुणे तसेच परजिल्ह्यात राहणाऱ्या सातारकरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. एसटी बस व खासगी वाहनांतून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या अगणित आहे. येणाऱ्या नागरिकांवर कोणतेही निर्बंध नसल्याने कोण कुठून आला व कोठे गेला, याची कोणतीही नोंद सध्या प्रशासनाकडे नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता प्रशासनाला पुन्हा एकदा ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
(चौकट)
साताऱ्याहून बाहेरगावी जाण्याचे प्रमाण कमी
एसटी विभागाच्या पुणे-सातारा दररोज २२ फेऱ्या होतात. गेल्या काही दिवसांत हे प्रमाण सध्या कमी झाले आहे. तरीही साताऱ्यातून पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या कमी तर पुण्याहून साताऱ्याकडे येणाऱ्यांची संख्या मात्र अधिक आहे. याशिवाय खासगी वाहनांनी मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यांतूनदेखील मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करीत आहेत.
(चौकट)
ना मास्क, ना डिस्टन्स
जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची सतत वर्दळ असते. प्रवाशांकडून फिजिकल डिस्टन्स पाळला जात नाही. अनेक जण मास्कचा वापरही करत नाहीत. परजिल्ह्यातून येणाऱ्या काही एसटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आता परिवहन विभागाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
(पॉइंटर)
१. गतवर्षी पुणे, मुंबईहून साताऱ्यात परतणाऱ्या नागरिकांची पालिका प्रशासनाकडून नोंद ठेवली जात होती.
२. परगावाहून जर कोणी घरी आला तर अशा नागरिकांची माहितीदेखील पालिका प्रशासनाला तातडीने दिली जात होती.
३. अशा नागरिकांना गृहविलगीकरणातून ठेवले जात होते.
४. अनेकांची आरटीपीसीआर चाचणीदेखील केली जात होती.
५. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात होते.
६. परगावाहून येणाऱ्यांच्या अशा कोणत्याही नोंदी आता प्रशासनाकडे नाहीत.
७. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून कोरोना चाचणी करून घेतल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.
फोटो : मेल
साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची अशी गर्दी उसळलेली असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही प्रवाशांकडून फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. (जावेद खान)