पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या
By दत्ता यादव | Updated: March 26, 2024 15:28 IST2024-03-26T15:28:02+5:302024-03-26T15:28:18+5:30
त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही.

पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या
सातारा : पुण्यातील पीएमटीचे बसचालक अभिजित तानाजी शिंदे (वय ३६, रा. सोनगाव, ता. जावळी, जि. सातारा) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, दि. २५ रोजी दुपारी एक वाजता सोनगाव, ता. जावळी येथे घडली. दरम्यान, त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही.
याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिजित शिंदे हे पुणे येथील पीएमटीमध्ये (पुणे महानगरपालिका परिवहन) बसचालक म्हणून काम करत होते. चार दिवसांपूर्वी ते सुटी घेऊन गावी आले होते. सोमवारी दुपारी त्यांनी सोनगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या ओट्यावर विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत उत्तम नारायण शिंदे (वय ४५, रा. सोनगाव, ता. जावळी) यांनी मेढा पोलिस ठाण्यात खबर दिली असून, हवालदार नंदकुमार कचरे हे अधिक तपास करीत आहेत.