पुण्याचा संघ खासदार चषकाचा मानकरी-सातारा संघाला उपविजेतेपद; महिला चषक नागपूर संघाला प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 09:02 PM2018-06-07T21:02:37+5:302018-06-07T21:02:37+5:30
उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला.
सातारा : उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. तसेच खासदार चषकाचा बहुमानही पटकविला. या स्पर्धेत सातारा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र राज्य बास्केट बॉल असोसिएशन, सातारा जिल्हा बास्केट बॉल असोसिएशन, रणजित अॅकॅडमी सातारा व सातारा नगरपालिका यांच्या वतीने गेले सहा दिवस सुरूअसलेल्या १६ वर्षांखालील मुलांसाठी आयोजित ‘खासदार उदयनराजे भोसले चषक’ पुणे विभागीय संघाने पटकाविला. या सामन्यात प्रारंभीपासूनच पुणे संघाने लीड घेत मध्यापर्यंत ४० गुण केले, तर सातारा संघ ३३ गुणांवर होता. मध्यापर्यंत असलेली ७ गुणांची आघाडी पुढे कायम ठेवत पुणे संघाने हा सामाना जिंकला.
या स्पर्धेचे पुरस्कार वितरण पालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, बास्केटबॉल संघटनेचे माजी राज्याध्यक्ष रमेश शानभाग, राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न गोखले, जयंत देशमुख, सचिव ललीत नहाटा, रवींद्र नायर, धनंजय वेलुकर, उद्योजक सलीम कच्छी, निशांत गवळी, नासीर अन्सारी, निखील लातूरकर, अमजद कादरी, गटनेत्या स्मिता घोडके, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, महिला बालकल्याण सभापती अनिता घोरपडे, क्रीडा स्पर्धा संपर्क प्रमुख किशोर शिंदे, नगरसेवक विशाल जाधव, सागर साळुंखे, रोहन गुजर, अर्णिका गुजर यांच्यासह पालिकेतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.
विजेतेपदाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण..
पुरस्कार वितरण सोहळ्यात महिला (१६ वर्षांखालील मुली) विभागाचे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार उत्तर मुंबई संघास, उपविजेता पुरस्कार सातारा संघास तर विजेतेपदाचा पुरस्कार व खासदार चषक नागपूर संघास मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुरुष (१६ वर्षांखालील मुले) विभागाचे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नागपूर संघास, उपविजेता पुरस्कार सातारा संघास तर विजेतेपदाचा पुरस्कार व खासदार चषक पुणे संघास मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सातारा येथे १६ वर्षांखालील मुलांचा खासदार चषक उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना पुणे संघ. यावेळी रमेश शानभाग, सलीम कच्छी, ललीत नहाटा, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, यशोधन नारकर, निशांत गवळी, अर्णिका गुजर, साजिदा बागवान, उत्तमराव माने, मनोज शेंडे, रोहन गुजर आदींची उपस्थिती होती.