पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 09:55 AM2018-07-10T09:55:55+5:302018-07-10T09:59:28+5:30
भरधाव वेगातील आयशर टेम्पो संरक्षक कठडा तोडून पलटी झाल्याने अपघात
खंडाळा ( सातारा ) : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर पहिल्याच वळणावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील आयशर टेम्पो संरक्षक कठडा तोडून पलटी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावरून जाणारा आयशर टेम्पो एम एच १९७० हा खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर भरधाव वेगाने पहिल्या वळणावरुन जाताना वाहनावरील ताबा सुटल्याने संरक्षक कठडा तोडून बाजूच्या दरीत कोसळला. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असून टेम्पोचे चालक गजानन लक्ष्मण राणे (वय - 50), हर्षद अच्युत गावडे (वय - 35) हे जागीच ठार झाले आहेत. तर स्वप्नील संतोष लोटीये (वय -25) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलिसांनी धाव घेऊन जखमीला मदत केली. जखमीला तातडीने उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार अमोल मर्ढेकर करत आहेत .
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच खंडाळा तहसिलदार विवेक जाधव हे तत्काळ घटनास्थळी पोहचले. तसेच अपघातग्रस्तांना मदतीकरीता त्यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत.