महसूल क्रीडा स्पर्धेत पुणे संघ विजेता, कोल्हापूरला उपविजेतेपद; साताऱ्यात पार पडल्या स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:17 IST2025-02-11T15:16:21+5:302025-02-11T15:17:24+5:30

सातारा : पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पुणे संघाने पटकावले. उपविजेतेपद कोल्हापूर संघाला, तर सातारा ...

Pune team wins, Kolhapur becomes runner up in Revenue Sports Competition in Satara | महसूल क्रीडा स्पर्धेत पुणे संघ विजेता, कोल्हापूरला उपविजेतेपद; साताऱ्यात पार पडल्या स्पर्धा

महसूल क्रीडा स्पर्धेत पुणे संघ विजेता, कोल्हापूरला उपविजेतेपद; साताऱ्यात पार पडल्या स्पर्धा

सातारा : पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पुणे संघाने पटकावले. उपविजेतेपद कोल्हापूर संघाला, तर सातारा संघ तृतीय स्थानी राहिला. विजेत्या संघांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातून गुणवान खेळाडू दिसून आले असून देशपातळीपर्यंत नागरी सेवेच्या स्पर्धांत सहभागी हाेऊन खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

सातारा येथील पोलिस परेड ग्राउंडवर गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस वितरण झाले. जिल्हाधिकारी संतोष पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. पुलकुंडवार म्हणाले, साताराच्या पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे नेटके नियोजन केले आहे. स्पर्धेत कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली नाही. स्पर्धेतून राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ बालेवाडी येथे सराव करण्यासाठी पाठवावे. राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाला सर्वसाधारण विजेतेपद मिळण्यासाठी सर्वांनी यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. एकत्रित काम केले तर कार्यक्रमाचे चांगले नियोजन करता येते हे यातून दाखवून दिले आहे. खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे.

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी पुणे येथे होणार आहे. सातारा महसूल विभागाकडून क्रीडा ध्वजाचे पुणे महसूल विभागाला हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Pune team wins, Kolhapur becomes runner up in Revenue Sports Competition in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.