सातारा उत्सवाच्या मैफलीत पुणेरी भैरवी!
By admin | Published: September 7, 2014 10:15 PM2014-09-07T22:15:58+5:302014-09-07T23:22:49+5:30
जुने कलाप्रकार झाले दुर्मिळ
सातारा : सातारकरांचा प्रेमळ पाहूणचार घेऊन बाप्पा घरी निघाले आहेत. दहा दिवस रंगलेल्या या मैफलीची भैरवी पुणे-मुंबई आणि अन्य शहरांमधून खास मागविलेल्या पथकांच्या ढोलांचा दणदणाट आणि सुरेल ब्रास बँडने रंगणार आहे. याखेरीज जिल्ह्याच्या विविध भागांमधून ढोल, झांजपथके खास मागविण्यात आली आहेत.
बाप्पांची विसर्जन मिरवणूक म्हणजे डॉल्बी, डीजेचा दणदणाट आणि बेधुंद नाचणारी तरुणाई हे चित्र नेहमीच दिसते. यावर्षीही डॉल्बीच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन होऊनसुद्धा अनेक मंडळांनी ‘कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव’ पुन्हा डॉल्बीकडेच पावले वळविली आहेत. करंढोल, करंडी आणि झांज हे पूर्वीचे त्रिकूट कधीच कालबाह्य झाले आहे. त्याऐवजी आलेली ढोलपथके आणि झांजपथके सध्या जास्तच भाव खात आहेत. शहरातील विसर्जन मिरवणुकीत अशी अनेक ढोलपथके पाहायला मिळणार असून, त्यात पुणेरी पथकांचा समावेश अधिक आहे. वेगळे ठेके आणि एकवाक्यता हे पुण्यातील ढोलपथकांचे वैशिष्ट्य असून, सुमारे महिनाभर कसून सराव केल्यामुळे कलावंतांमध्ये चांगला समन्वय पाहायला मिळतो, असे त्यांना आमंत्रित करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.याखेरीज शहराजवळच्या शेंद्रे, वळसे येथील ढोल-झांज पथकांनाही मागणी आहे. या झांजपथकांचे वैशिष्ट्य म्हणजे चित्तथरारक कसरती, मनोरे आणि त्यातून साकारणारे विविध आकृतिबंध. पिरॅमिड्स आणि रथाची प्रतिकृती ही वैशिष्ट्ये जिल्ह्यातील ढोल-झांजपथकांनी जपली आहेत.
पुणे आणि बारामती येथील बँडपथकांनाही अनेक मंडळांनी आमंत्रित केले आहे. पुण्याचे अलंकार आणि दरबार यांसारखे जुने, प्रसिद्ध ब्रास बँड ढोल-ताशांच्या जमान्यातही आपले महत्त्व राखून आहेत. ट्रम्पेट आणि क्लोरोनेटसारखी कष्टसाध्य वाद्ये वाजविणारे कलावंत दुर्मिळ होत असताना या संचांनी ही कला टिकविली आहे.
डॉल्बीच्या धबडग्यात आवाज ऐकू यावा म्हणून या बँडपथकांनी अत्याधुनिक ध्वनियंत्रणेचा आधार घेतला आहे. (प्रतिनिधी)
जुने कलाप्रकार झाले दुर्मिळ
सातारच्या विसर्जन मिरवणुकीत पूर्वी सर्रास दिसणारे कलाप्रकार आता अत्यल्प प्रमाणात पाहायला मिळतात. शिवाजी उदय मंडळाने वेगवेगळी लोकनृत्ये सादर करण्याची परंपरा जपली आहे. शनिवार पेठेतील युवकांनी दांडपट्टा, तलवारबाजीची कला जिवंत ठेवली आहे. परंतु लेझीम पथके, गोफ नृत्ये, गजी नृत्ये, कोकणी बाल्या नृत्य बाप्पांच्या मिरवणुकीत हल्ली अभावानेच पाहायला मिळत आहेत.