नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:31+5:302021-03-04T05:12:31+5:30
मलकापुरात कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा विविध उपाय सुरू केले आहेत. शासन, पालिकेचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी, आरोग्य व पोलीस विभागाने ...
मलकापुरात कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा विविध उपाय सुरू केले आहेत. शासन, पालिकेचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी, आरोग्य व पोलीस विभागाने रात्रीचा दिवस करून शहराला कोरोनामुक्त केले होते. यामध्ये सातत्य राखण्यासाठी अनेक उपाय वरचेवर राबवले जात आहेत. मात्र, काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरात गतीने उपाय सुरू केले आहेत. शहरातील नागरिकांना नियमांची शिस्त लावण्यासाठी शहरात गस्त पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांनी दोन दिवसांत शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्या ५० ते ६० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी १०० ते ५०० रुपयांप्रमाणे १० हजार रुपये दंड वसूल केला. दंडात्मक कारवाईची मोहीम वारंवार राबवावी, अशी मागणी सूज्ञ नागरिकांमधून होत आहे. मोहिमेत करनिरीक्षक राजेश काळे, राम गायकवाड, पंकज बागल, सुभाष बागल, सुरेश कराळे, संतोष लोखंडे, वैभव हुलवान यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
- चौकट
नाक-तोंड मोकळेच, मास्क गळ्यात!
कोरोनावर मात करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे. सामाजिक अंतरासह मास्क लावणे असे अनेक नियम बंधनकारक केले आहेत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेचे पथक कारवाई करते. मास्क घालणे बंधनकारक असतानाही बहुतांशी नागरिक नाक-तोंड मोकळेच ठेवून मास्क शोसाठी गळ्यातच अडकवत आहेत.
- चौकट
पोलिसांना चकवा देत दुचाकी सुसाट
दुचाकीवरून मास्क न घालता फिरण्यास मनाई आदेश आहे. यावर बंधन ठेवण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस पालिकेच्या मदतीने कारवाई करतात. शहरात अनेक ठिकाणी अशी कारवाई होत असतानाही अनेक दुचाकीस्वार पोलिसांना चकवा देत दोघे-दोघे, तर काहीजण तिघे-तिघे विनामास्क बसून सुसाट जातात. त्यामुळे कोरोनाची भीतीच नसल्याचे चित्र दिसत आहे.
- चौकट
पालिकेतर्फे मास्कचे मोफत वाटप
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलकापूर पालिकेने एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत विनामास्क फिरणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी दंड केला जात आहे. त्याचबरोबर पालिकेकडून मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले.
फोटो : ०२केआरडी०३
कॅप्शन : मलकापुरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. (छाया : माणिक डोंगरे)