गोंदवले कोठी पूजनाने पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:38+5:302021-01-02T04:54:38+5:30
म्हसवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. मंदिर परिसरातील मुख्य ...
म्हसवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. मंदिर परिसरातील मुख्य सभामंडपात श्रीराम नामाच्या जयघोषात कोठी पूजन करण्यात आले.
गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला असून, ८ जानेवारी रोजी समाधीवर गुलालाच्या उधळणीने सांगता होणार आहे. परंपरेनुसार गुरुवारी सकाळी कोठी पूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्तांच्या हस्ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका व प्रतिमेचे विधीपूर्वक पूजन करण्यात आले. त्यानंतर गोमातेचेही पूजन करण्यात आले. स्वयंपाक घरातील चुलींचेदेखील पूजन करून भट्टी पेटविण्यात आली. मंदिर परिसरातील श्री ब्रह्मचैतन्य नाम साधना मंदिरात एक माळ जप करण्यात आला. त्यानंतर समाधी मंदिरात श्रीकृष्ण पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
दरम्यान, ब्रह्मनंद सभा मंडपात श्री महाराजांच्या पादुकांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. स्वयंपाकघरातही भांड्यांची सुबक रचना करण्यात आली होती. मुख्य कोठीत अन्नधान्याच्या वस्तूंना फुलांनी सजविण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवानिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली असून, समाधी मंदिरात सेवेकरी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रोजचे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करून भाविकांसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच ७ व ८ जानेवारीला भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी घरीच पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
०१गोंदवले
गोंदवले (ता. माण) येथील ब्रह्मनंद सभा मंडपात श्री महाराजांच्या पादुकांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती.