‘बजेट हाउसिंग, प्लॉट’ खरेदीकडे ओढा
By Admin | Published: February 15, 2015 11:06 PM2015-02-15T23:06:26+5:302015-02-15T23:49:45+5:30
रचना प्रदर्शन : सातारकरांचा भरभरून प्रतिसाद; बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण
सातारा : शहरापासून थोड्या अंतरावर पण निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या वातावरणात हक्काचं घर असावं. चिमुकल्यांना बागडायला अन् वृद्धांना विसावा घ्यायला घरासमोर बगिचा असावा. सर्व सोयीसुविधा हाकेच्या अंतरावर असणारं असं एखादं घर आपल्याला परवडणाऱ्या किमतीत मिळावं, हीच एकमेव अपेक्षा आहे सातारकरांची. तसेच ‘प्लॉट’ खरेदीकडेही सातारकरांचा ओढा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर ‘रचना २०१५’ हे बांधकामविषयक सर्वकाही असणाऱ्या प्रदर्शन भरवलंय. जवळपास शंभर स्टॉल यामध्ये उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनात घरकुलांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी शेकडो सातारकरांनी भेट देऊन आपल्या स्वप्नातल्या घरकुलाची चाचपणी केली तर अनेकांनी बुकिंगही केले. गुंतवणुकीसाठी जागा खरेदी करण्याकडेही मोठा कल असल्याचे दिसून येत आहे. साताऱ्याबरोबरच पुणे, मुंबई, कोल्हापूर,
सांगली याठिकाणी तसेच नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या सातारकरांनी प्लॉट खरेदीसाठी पसंती दर्शविल्याचे दिसते. हे प्रदर्शन चार दिवस चालणार असून दि. १७ रोजी सायंकाळी ८ वाजता सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)
जागा खरेदीत गुंतवणूक केली तर भविष्यात ती जास्त फायदेशीर ठरते, शिवाय आपल्या हवे तसे घरही बांधता येते. त्यामुळे मुंबईस्थित सातारकरांचा ‘विकेन्ड होम’साठी जागा खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
- मजिद कच्छी,
संचालक, कच्छी प्रॉपर्टीज्
‘बजेट हाउसिंग’ ही संकल्पना
सातारकरांमध्ये वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे साताऱ्यात इंडस्टी नाही, त्यामुळे इनकमही कमी आहे. साहजिकच लोकांना त्यांच्या खिशाला परवडतील अशा बजेटमध्ये बसणारं घर हवंय.
- बालाजी मद्रेवार,
व्यवस्थापक प्रमुख, कंग्राळकर असोसिएटस्
परजिल्ह्यांतूनही प्रतिसाद
सातारा जिल्ह्यातील व इतर अनेक जिल्ह्यातील बिल्डर्सनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून अतिशय नाविन्यपूर्ण व आधुनिक स्टॉल्स्ची उभारणी प्रदर्शनामध्ये केली आहे. परजिल्ह्यातील ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कृत्रिम वाळू
निर्मिती यंत्र
प्रदर्शनात कृत्रिम वाळू निर्मितीचे मशिन, रेडिमिक्स काँक्रीट मोबाईल बॅचिंंग प्लँट, काँक्रीट ब्लॉक मशिनरी, डोमेस्टीक लिफ्ट अशा यंत्रांचा समावेश आहे.
उत्कृष्ट स्टॉलला गौरविणार
प्रदर्शनातील उत्कृष्ट स्टॉलला दि. १७ रोजी होणाऱ्या समारोप कार्यक्रमात विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.