औषधं मोफत अन् पाणी विकत --: सातारा जिल्हा रुग्णालयातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:02 AM2019-06-07T00:02:17+5:302019-06-07T00:02:32+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप
दत्ता यादव ।
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय हे गोरगरिबांची रुग्णवाहिनी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांची राहण्याची जबाबदारी सिव्हिल प्रशासन घेतेय तर जेवणाचा खर्च सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. या दोन्ही सुविधा रुग्णांना चांगल्या प्रकारे मिळत आहेत. मात्र, पाण्याची व्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. असं पण नाही की, सिव्हिलमध्ये रोज पाणी येत नाही. पाणी उपलब्ध आहे; पण त्याचे व्यवस्थापन नीट होत नसल्याने रुग्ण आणि नातेवाइकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे.
सिव्हिलमध्ये औषधांपासून सर्वच उपचार रुग्णांना मोफत मिळत असताना पाण्यासाठी मात्र पैसे खर्च करावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही रुग्ण सिव्हिलमध्ये आठ ते दहा दिवस अॅडमिट असतात. रुग्णासोबत नातेवाईकही असतात. हे माहिती असल्यामुळे अनेक व्यावसायिकांनीही पाण्याच्या बॉटल विक्रीस ठेवल्या आहेत. प्रवेशद्वारासमोर अनेकांनी आपले दुकाने थाटली असून, पिण्याची अकरा रुपयांची बाटली वीस रुपयांना विकली जात आहे. नातेवाइकाला आणि रुग्णाला दिवसाकाठी पिण्याच्या चार बाटल्या लागल्या तरी दहा दिवसांत आठशे रुपये संबंधितांना मोजावे लागत आहेत. सिव्हिलमधून डिस्चार्ज घेताना फार फार तर दीडशे ते दोनशे रुपये रुग्णांना अत्यंत अल्प फी भरावी लागते. मात्र, औषधोपचारांपेक्षा पाण्यासाठीच पैसे खर्च होत रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.
पाण्याभोवती अस्वच्छता..
सिव्हिलमध्ये असणाºया पाण्याच्या टाकीभोवती प्रचंड प्रमाणात अस्वच्छता आहे. तसेच दुर्गंधीही पसरत असल्यामुळे तेथील कोणी पाणी पित नाही. परिणामी नाईलाजास्तव रुग्ण व नातेवाईक पाणी बाहेरहून विकत आणणे पसंत करत आहेत. अस्वच्छ पाणी पिले तर आणखी कोणताही आजार उद्भवेल, अशी भीती नातेवाइकांना असल्यामुळे सिव्हिलमधील पाणी पिण्यास कोणीही धजावत नाही.
ऐन उन्हाळ्यात गरम पाणी!
सध्याच्या तापमानामुळे पाण्याच्या टाकीतील पाणी गरम होत आहे. अगोदरच उन्हामुळे घसा कोरडा होत असताना थंड पाणी पिण्यासाठी अनेकांचा जीव कासावीस होत असतो. त्यामुळे हे गरम पाणी पिण्यापेक्षा बाटलीतील थंड पाणी अनेकजण पित आहेत. रुग्णांच्या सोयीसुविधेसाठी शासनाकडून लाखो रुपये निधी येत असतो. त्यातून रुग्णांना चांगले पाणी मिळावे, यासाठी वॉटर प्युरीफायर आणि कूलरसारखी सुविधा रुग्णालय प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाइकांमधून व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मिनरल बॉटलचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे.