विकत घेतली सायकल; ग्रामस्थांना वाटले पेढे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:36 AM2021-03-06T04:36:59+5:302021-03-06T04:36:59+5:30
कोपर्डे हवेली : इंधनाच्या वाढत्या दरामुळे प्रत्येकाच्या खिशाला कात्री लागली आहे. त्याला पर्याय म्हणून सध्या अनेकांनी सायकलचा वापर सुरू ...
कोपर्डे हवेली : इंधनाच्या वाढत्या दरामुळे प्रत्येकाच्या खिशाला कात्री लागली आहे. त्याला पर्याय म्हणून सध्या अनेकांनी सायकलचा वापर सुरू केला असून, सायकल खरेदीकडे ओढा वाढल्याचे दिसून येत आहे.
कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) सागर चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वी नवीन सायकल खरेदी केली. ही सायकल त्यांनी थेट गावातील सिद्धनाथ देवालयासमोर आणली. त्या ठिकाणी सायकलचे पूजन करून त्यांनी ‘वाढत्या इंधन दरामुळे वाहने परवडणार नाहीत, सायकलचा वापर करा,’ असा संदेशच दिला. गत काही वर्षांत दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चालणेच बंद झाले आहे. गावातल्या गावात फिरण्यासाठीही दुचाकीचा वापर वाढला आहे. सायकल चालविणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत राहिली आहे. सायकल चालविणे कमीपणाचे वाटत आहे. घरोघरी पूर्वी सायकली असायच्या. कालांतराने त्यामध्ये बदल होऊन सायकलींची जागा दुचाकीने घेतली. सध्या अनेकांच्या घरी शोधूनही सायकल सापडत नाही. ज्यांच्याकडे आहेत ते केवळ व्यायामासाठी सायकल चालवीत आहेत.
सायकलच्या तुलनेत गावोगावी दुचाकींची संख्या वाढल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपासून पेट्रोलचा आणि डिझेलचा दर वाढत आहे. त्यामुळे दुचाकी चालविणे जिकिरीचे बनले आहे. दुचाकीच्या किमतींतही भरमसाट वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागासह शहरांतील लोकांचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे दिसत आहे. अनेकांनी नवीन सायकल खरेदी केली आहे; तर काहींनी अडगळीत पडलेल्या सायकलीची दुरुस्ती केली आहे.
कोपर्डे हवेली गावात नवीन वाहन आणले की सिद्धनाथ मंदिरासमोर त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. काही वर्षांपूर्वी नवीन सायकलचे असेच पूजन केले जायचे; पण सायकलचे महत्त्व कमी झाल्याने तिचे पूजनही बंद झाले होते. मात्र, सागर चव्हाण यांनी सायकलची खरेदी करून तिचे पूजन सिद्धनाथ मंदिरासमोर पेढे वाटून केले. आता ‘सायकल वापरा आणि डिझेल पेट्रोलवरचा खर्च टाळा,’ असा संदेश त्यांनी दिला.
- कोट
वाढत्या दरामुळे पेट्रोल परवडत नाही. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी मी नवीन सायकल आणली आहे. प्रत्येकाने सायकलचा वापर करावा यासाठी सायकलचे पूजन मंदिरासमोर केले.
- सागर चव्हाण, कोपर्डे हवेली
- चौकट
सायकल वापराचे फायदे
१) मर्यादित किंमत.
२) खर्चात बचत; शिवाय व्यायाम
३) अपघाताचे प्रमाण कमी
४) चोरीची भीती कमी
५) वापरही मर्यादित
फोटो : ०५केआरडी०३
कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील सिद्धनाथ मंदिरासमोर सायकलचे पूजन करण्यात आले.