खरेदी केलेले दागिने दुकानातून बाहेर येताच गायब; पाच लाखांचे नुकसान
By दत्ता यादव | Published: October 23, 2022 09:03 PM2022-10-23T21:03:43+5:302022-10-23T21:04:13+5:30
तब्बल पाच लाखांचे दागिने चोरीस गेल्याने संबंधित महिलेला मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.
सातारा : बाजार पेठेत सध्या खरेदीसाठी गर्दी होत असून, या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे एेवजावर डल्ला मारत आहेत. असाच प्रकार दि.२१ रोजी दुपारी तीन वाजता साताऱ्यात घडला असून, सराफ दुकानातून पाच लाखांचे दागिने खरेदी करून बाहेर पडलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबविली. तब्बल पाच लाखांचे दागिने चोरीस गेल्याने संबंधित महिलेला मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजश्री राजेंद्र कणसे (वय ५२, रा. राधिकानगर, गोडोली सातारा) या व्यावसायिक असून, दि. २१ रोजी दुपारी शनिवार पेठेतील एका सराफ दुकानात सोने खरेदीसाठी गेल्या होत्या. संबंधित दुकानातून त्यांनी ५ लाख २४ हजार ३०० रुपये किमतीची पाच सोन्याची वेढणी प्रत्येकी दोन तोळे वजनाची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी हे दागिने पर्समध्ये ठेवले. त्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी दागिन्यांची पर्स एका पिशवीत ठेवली. त्या चालत दुकानापासून काहीअंतर पुढे गेल्यानंतर त्यांच्या पिशवीतील दागिन्यांची पर्स गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी दागिन्यांची पर्स कोठे पडली आहे का, हे रस्त्याने पाहले. परंतु त्यांना पर्स काेठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
एेन दिवाळीत अशा प्रकारे एेवजावर डल्ला मारणारी टोळी बाजार पेठेत फिरत असल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.