दोन लाख तीस हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट
By admin | Published: July 2, 2017 04:41 PM2017-07-02T16:41:53+5:302017-07-02T16:41:53+5:30
माण तालुका : प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी वृक्षारोपण
आॅनलाईन लोकमत
म्हसवड , दि. 0२ : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत माण तालुक्यात विविध ठिकाणी सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वनमहोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या अंतर्गत वनविभागातर्फे माण तालुक्यात दोन लाख तीस हजार तीनशे वीस वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोप लावून करण्यात आली.
सयाजी शिंदे यांचे हस्ते पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी व गोडसेवाडी येथे रोपे लावण्यात आली. तर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व वनक्षेत्रपाल आर. बी. धुमाळ यांचे हस्ते खुटबाव येथे वृक्षारोपण करण्यात आली. मोगराळे, तोंडले, टाकेवाडी, येळेवाडी, वळई व वडजल येथे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, दहिवडीच्या नगराध्यक्ष साधना गुंडगे यांच्यासह माणमधील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच त्या त्या गावातील सरपंच यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली.
या रोप लागवड कार्यक्रमात वन विभाग, कृषि विभाग, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, तहसील कार्यालय यांच्यासह शालेय विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.