खंडोबाचा मिरवणूक मार्ग पुरात
By admin | Published: January 6, 2017 11:05 PM2017-01-06T23:05:39+5:302017-01-06T23:05:39+5:30
लाखो रुपये पाण्यात : पालीच्या यात्रेसाठी वाळवंटात थाटलेल्या राहुट्यांवर जलसंकट
उंब्रज : पालच्या खंडोबाची यात्रा चार दिवसांवर आली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून नऊ ते दहा लाख भाविक येतात. मिरवणूक मार्ग हा पात्रातून असतो. यात्रेसाठी लाखो रुपये खर्चून मिरवणूक मार्ग तयार केला आहे. तारळी धरणाचा दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटल्यामुळे तारळी नदीपात्रातील पाणी पातळी वाढ झाली. या पुरात मिरवणूक मार्ग वाहून गेला. तर वाळवंटात नदीपात्रालगतची दुकाने हलवण्यास सांगितली
आहेत.
तारळी धरणाच्या दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटला. त्यामुळे तारळे, पाल परिसरात घबराट पसरली. नदीपात्रातील प्रवाह वाढला. पालच्या खंडोबा यात्रेतील मिरवणुकीसाठी तयार केलेला मिरवणूक मार्ग पाण्याच्या प्रवाहात काही क्षणात वाहून गेला. तसेच वाळवंटातील काही दुकाने नदीपात्राजवळ होती ती दुकाने हलविण्यास प्रशासनाने सांगितले आहे. मोठ्या कष्टातून आणलेले साहित्य पाण्यात वाहून गेले तर
काही हाती लागणार नाही. या भीतीने येथील व्यापाऱ्यांनी वाहनातून
साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
नदीत जाण्यापासून पोलिसांनी रोखले
उंब्रज पोलिस ठाण्यातील लक्ष्मण जगदन्ने, विकास घोरपडे, कुंभार यांनी दिवसभर पालमधील यात्रास्थळावर थांबून दुकानदार, ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना देत होते. तसेच नदी पात्र व पाण्याच्या जाण्यापासून रोखत होते.
आढावा बैठकीतही गाजला होता विषय
पालमध्ये दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांनी यात्रा नियोजन बैठक घेतली होती. यावेळीही जिल्हाधिकारी मुदगल यांनी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना ‘नदी पात्रात प्रवाह जास्त का आहे?,’ असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ‘धरणाला गळती आहे. ती काढण्यासाठी वरिष्ठांना कळविले आहे,’ असे उत्तर दिले होते.
यावेळी यात्रा कालावधीत नदीपात्रातील पाण्यात वाढ होणार नाही, असे लेखी देऊ शकता का? असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. त्यावेळी त्यांनी गप्प राहून ‘गळती काढण्यासाठी प्रयत्न करू,’ असे उत्तर दिले होते. पण शुक्रवारी नको तेच घडले. दरवाजाच्या व्हॉल्व्हचा पत्रा तुटला, धरण व्यवस्थापन अधिकारी वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष देत नाहीत. मनमानी कारभार करतात हे या घटनेवरून अधोरेखीत झाले.