पुसेगाव परिसराला वळवाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:17+5:302021-04-13T04:38:17+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील विविध गावांत सोमवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने विजांचा कडकडाट आणि ...
पुसेगाव : खटाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील विविध गावांत सोमवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुसेगावसह परिसरात सोमवारी सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. असे असलेतरी शेतकरी व वीटभट्टीमालकांना मात्र, या पावसाचा मोठा फटका बसला. हा पाऊस पुसेगाव व परिसरातील बुध, राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी, उंबरमळे, निढळ, कटगुण, खातगुण, विसापूर, वर्धनगड, पवारवाडी, नेर या भागात पडला. वादळीवारा व मेघगर्जनेसह पाऊस झाला.
दरम्यान, अजूनही रबी हंगामातील पिकांची सुगी काही ठिकाणी सुरू आहे. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचा कडबा शेतात पडून आहे. या पावसाने कडबा भिजला आहे. काही ठिकाणी कांद्याची काढणी व काटणी सुरू आहे. या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. तर पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.