पुसेगावात बिनधास्त ‘संचार’तर ‘बंदी’ केवळ नावाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:29+5:302021-04-18T04:38:29+5:30
पुसेगाव : कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी वीकेंडला कडक संचारबंदी असूनही पुसेगावात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. विनाकारण मोठ्या संख्येने ...
पुसेगाव : कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी वीकेंडला कडक संचारबंदी असूनही पुसेगावात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. विनाकारण मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. दुचाकी, चारचाकी गाडीतून फेरफटका चालूच असून, बऱ्याच बंद दुकानांसमोर घोळक्याने चकाट्या मारणाऱ्यांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अशांना कुणीतरी जाब विचारणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता भासू लागली आहे.
गेल्या वर्षी याच पुसेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःहून ‘जनता कर्फ्यू’ करून बाजारपेठ बंद ठेवत कडक संचारबंदी पाळणारी पुसेगाव व परिसरातील जनता सध्या अशी का वागत आहे, असा प्रश्न सुजाण नागरिक विचारताना दिसत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुुमारे १५ दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर वीकेंडला सर्वच बंद ठेवून कडक संचारबंदी आहे. मात्र, या अंशतः टाळेबंदीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन पुसेगाव (ता. खटाव) येथील काही नागरिक करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत असून, सुरक्षित अंतराच्या नियमांकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, अशा सूचना महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. मात्र, विनाकारण रस्त्याने चालत, दुचाकी - चारचाकीतून फिरणाऱ्यांना कुणीतरी जाब विचारणे गरजेचे आहे, यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता भासू लागली आहे.
पुसेगावसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाही “डॉक्टरकडे निघालो आहे”, “औषध आणायला जातो आहे”, “शेतीची खते आणायला चाललोय”, “बँकेत चाललोय”, “शेतातून आलोय”, “रेशनिंग आणायला चाललो आहे,” अशी एकापेक्षा एक अत्यावश्यक सेवेतील ‘खोटी’ कारणे देऊन नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. अशा चुकीच्या पद्धतीने बहुतांश नागरिक घराबाहेर पडून स्वत:च्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत. परिणामी, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक भ्रमंती करीत असल्याने प्रशासन टाळेबंदी का करतेय? याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज दिसून येत आहे.
दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथील नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून शासनाने दिलेले दिशा निर्देश पाळून कोरोना हद्दपार होईपर्यंत स्वतःला ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची गरज आहे.
चौकट :
प्रशासनाचा ‘कारवाईचा, कार्यवाहीचा’ धाक कमी झाला का?
गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात रस्त्याने पोलीस गाडी दिसली तरी लोक आपोआप पांगत होते. चौकातून ये-जा करताना ठोस कारण असेल तरच परवानगी दिली जात होती. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या व चकाट्या मारत उभ्या असणाऱ्या गावातील व आसपासच्या गावातून पुसेगावात येणाऱ्या नागरिकांना चाप बसत होता. कित्येक दुचाकी गाड्या कारवाईत पोलीस ठाण्यात विसावल्याही होत्या. महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या मदतीने नागरिक सुजाण होऊन कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेत होते. मात्र सध्या प्रशासनाचा ‘कारवाईचा आणि कार्यवाहीचा’ धाक कमी झाला आहे की काय? अशी शंका नागरिकांतून व्यक्त होत आहे.
१७पुसेगाव
फोटो : पुसेगाव (ता. खटाव) काही नागरिक विनाकारण घराबाहेर बाहेर पडत असून, बंद बाजारपेठेत, रस्त्यावर मोकाट संचार करीत आहेत.