पुसेगावची व्यापारी पेठ रविवारपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:54 AM2021-02-25T04:54:27+5:302021-02-25T04:54:27+5:30
पुसेगाव पुसेगावमध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी पेठ बुधवारपासून रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या ...
पुसेगाव
पुसेगावमध्ये वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी पेठ बुधवारपासून रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली येथील श्री सेवागिरी मंदिरात देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व्यापारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीस सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, मंडलाधिकारी तोरडमल, तलाठी गणेश बोबडे, वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुरेशशेठ जाधव, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.
पुसेगावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून बुधवारीही येथील एका विद्यालयातील दोन विद्यार्थिनींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. यात पुसेगाव व बुध येथील एका मुलीचा समावेश असून पालकवर्गातून भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, तालुक्याच्या उत्तर भागातील खटाव १, नेर १, वेटणे ३, पुसेगाव ५, काटकरवाडी ३, विसापूर १, बुध २ आणि रेवलकरवाडी येथील एका अशा १७ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उत्तर खटाव तालुक्यातील गावात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे.
शालेय मुलामुलींसोबतच आता नागरिकही कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, ग्रामपंचायत व प्रशासनाने एकत्र येत गावाच्या हितासाठी पुसेगाव बाजारपेठ पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कोरोनाने उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जास्तीतजास्त संशयितांच्या तसेच व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रुग्णांची संख्या पाहता संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात यावे, असे एकमताने ठरविण्यात आले. त्यानुसार, पुढील पाच दिवसांसाठी कंटेनमेंट झोनमधील सर्व प्रतिबंध गावात लागू करण्यात आले आहेत. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा या वेळी प्रभारी प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी दिला.
पुसेगावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार नागरिक व व्यापारीवर्गाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले आहेत.
ज्या शाळेतील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, त्या शाळा व्यवस्थापन समितीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही पुसेगावातील इतर शाळा व महाविद्यालये सुरू आहेत. गुरुवारी फलटण रोड, शुक्रवारी निढळ रोड, शनिवारी वडूज, तर रविवारी सातारा रस्त्यावरील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याबाबत प्रांताधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत.