पुसेगावातील व्यापारी, दुकानदारांची कोरोना चाचणीकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:20+5:302021-03-01T04:46:20+5:30
पुसेगाव : येथील एका विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यामुळे रविवारचा ...
पुसेगाव : येथील एका विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यामुळे रविवारचा आठवडा बाजारही भरला नाही. संबंधित विद्यालयातील सातशे विद्यार्थ्यांची चाचणी घेतली आहे; मात्र दोन दिवसात आलेल्या अहवालात सर्वजण निगेटिव्ह आले. प्रांताधिकाऱ्यांनी सूचना करुनही व्यापारी, दुकानदारांनी पाठ फिरवली. यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
येथील एका विद्यालयातील विद्यार्थी कोरोना बाधित सापडल्यामुळे पालकांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. वेळेचे भान ठेवून संबंधित शाळा व्यवस्थापनाने वेळीच शाळा बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे बाधित विद्यार्थ्यांच्या घरातील व्यक्तींचा कोरोनापासून बचाव झाला आहे. शाळेतील बाधित मुलांच्या घरातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्यात यश मिळाले आहे.
शाळेतील ७३९ पैकी ७०० विद्यार्थ्यांची चाचणीही केली आहे. दोन दिवसांत पाठवलेल्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुसेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शाळा बंद केली नसती तर या भागात कोरोनाने हाहाकार माजवला असता. सध्या या शाळेतील कोरोनाबाधित मुलांच्या संपर्कात आलेल्या सर्व ग्रामस्थांनी कोरोनाबाबत योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले आहे.कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत सुरू असलेल्या चर्चांवर विश्वास न ठेवता पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्याध्यापिकांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन पुसेगाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवसांपासून पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. रविवारचा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यावर पुसेगाव पोलिसांनी कडक कारवाई सुरूच ठेवली आहे. गुरुवारी २२ रुग्णांचे अहवाल सातारा येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यात चार जणाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात पुसेगाव, बुध, निढळ येथील तीन पुरुष तर विसापूर येथील एका महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी १४ जणांचे पाठवलेले अहवाल सर्वच निगेटिव्ह आले होते.
चौकट :
संसर्ग रोखण्यासाठी तपासणी गरजेची
तीन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी यांच्या समवेत पुसेगाव येथील श्री सेवागिरी मंदिरात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. येथील छत्रपती शिवाजी चौकातील चारही बाजूंच्या व्यापारी व दुकानदारांना कोरोना चाचणी करण्यासाठी वार ठरवून दिलेले होते. मात्र एकही व्यापारी किंवा दुकानदार कोरोना चाचणी करण्यासाठी येथील कोरोना केअर सेंटरकडे फिरकला नाही. लोकांशी नेहमी संपर्क येणारे व्यापारी व दुकानदार हे कोरोना स्प्रेडर असल्याने त्यांच्या कोरोना चाचण्या होणे गरजेचे आहे,’ असे मत वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर यांनी व्यक्त केले.