पुसेगावचे सेवागिरी मंदिर दोन दिवस दर्शनासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:40+5:302021-01-09T04:32:40+5:30
पुसेगाव : ‘लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव मंगळवारी (दि. १२) प्रशासकीय नियमांनुसार धार्मिक विधींसह पूर्वापार ...
पुसेगाव : ‘लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव मंगळवारी (दि. १२) प्रशासकीय नियमांनुसार धार्मिक विधींसह पूर्वापार प्रथेनुसार मात्र साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. शासनाच्या आवाहनानुसार ११ व १२ जानेवारी रोजी श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे,’ अशी माहिती सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव यांनी शुक्रवारी दिली.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि. ११) रात्री बारापासून ते १३ जानेवारी मध्यरात्री बारापर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. सातारा बाजूकडून दहिवडीकडे जाणारी वाहने पुसेगाव भागात न जाता नेर, राजापूर-कुळकजाईमार्गे दहिवडीकडे जातील व दहिवडीच्या बाजूकडून येणारी वाहने कटगुण, खटाव, खातगुण, जाखणगावमार्गे औंध फाट्याकडे विसापूरमार्गे साताऱ्याकडे जातील.
वडूज बाजूकडून फलटणकडे जाणारी वाहने पुसेगावात न येता खटाव, जाखणगाव, औंध फाटा, नेर लालगुणमार्गे फलटणला जातील; तसेच फलटण बाजूकडून वडूज बाजूकडे जाणारी वाहने लालगुण, नेर, औंध फाटा, जाखणगाव खटावमार्गे वडूजकडे जातील. तसेच दहिवडी ते डिस्कळ जाणारी व येणारी वाहतूक निढळ, मलवडी, राजापूरमार्गे जातील, अशी माहिती पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.
ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथोत्सवाच्या दिवशी केले जाणारे धार्मिक विधी व सुवर्णमंडित समाधीचे लाईव्ह दर्शन ट्रस्टचे अधिकृत फेसबुक पेज ‘परमपूज्य श्री सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव’ व यूट्यूब चॅनलवर दिसणार आहे. यावेळी विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव उपस्थित होते.
चौकट
भाविकांच्या आरोग्यासाठी निर्णय
‘श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने हा निर्णय दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी घेतला आहे. सेवागिरी महाराज रथोत्सवाच्या दिवशी आपापल्या घरी सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची पूजा, आरती करून त्यांचे स्मरण करावे,’ असे आवाहन मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी केले आहे.