Satara: सेवागिरी महाराजांच्या जयघोषाने पुसेगावनगरी दुमदुमली, लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव संपन्न
By दीपक शिंदे | Published: January 10, 2024 07:21 PM2024-01-10T19:21:52+5:302024-01-10T19:22:43+5:30
पुसेगाव : ‘श्री सेवागिरी महाराज की जय, ओम नमो नारायणा’च्या जयघोषात, बेलफुलांची उधळण करत, मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात ...
पुसेगाव : ‘श्री सेवागिरी महाराज की जय, ओम नमो नारायणा’च्या जयघोषात, बेलफुलांची उधळण करत, मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात बुधवारी श्री सेवागिरी महाराजांचा ७६ वा रथोत्सव सोहळा पार पडला. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे सात ते आठ लाखांहून अधिक भाविक, तसेच यात्रेकरूंनी हजेरी लावली.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. प्रारंभी फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रथपूजन झाले. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी सनदी अधिकारी सुरेश जाधव, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, देवस्थानचे माजी चेअरमन व माजी विश्वस्त व पुसेगावचे ग्रामस्थ, भाविक, यात्रेकरू उपस्थित होते.
श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस सकाळी १० वाजता प्रत्यक्षात प्रारंभ झाला. भाविकांनी श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत व यात्रा शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे यात्रेकरूंना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात येत आहे.