अखेर पालकमंत्र्यांची दहा दिवसानंतर पुसेसावळीला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 11:55 AM2023-09-20T11:55:13+5:302023-09-20T11:55:42+5:30
पोलिस यंत्रणेने तपासाला गती द्यावी..
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे १० सप्टेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून दोन गटांतील दंगलीमध्ये मृत झालेल्या नुरूल हसन शिकलगार याच्या घरी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.
जिल्ह्यात असूनही पालकमंत्र्यांनी गेले दहा दिवस पुसेसावळीला जाणे टाळले होते. अखेर काल राज्याचे उपमुख्यमंत्री पुसेसावळीत येऊन गेल्यानंतर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुसेसावळीला भेट दिली. ‘माझ्या मुलाचा काहीही दोष नसताना बळी गेला, आमचं कुटुंब पोरकं झालं, आमची दोन्ही कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत, आता आम्ही जगायचे ते कुणासाठी, अशी भावना नुरूल हसनच्या वडिलांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार अजितराव जंगम, विस्तार अधिकारी नंदकिशोर माने, माजी सरपंच सुरेश पाटील, सरपंच सुरेखा माळवे, उपसरपंच डॉ. विजय कदम, उदय मावळे, मोहंमद हनीफ आदमभाई शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, अनेक लोक पिढ्यान् पिढ्या एकत्रितपणे गावात राहत असून, या गावात कधीही दंगल झाली नाही. आता पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गावातील लोकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखावी. तसेच या दंगलीमध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई होईल; परंतु जे निर्दोष आहेत यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे, त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तरी पुसेसावळी ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे.’
ग्रामस्थांचे सहकार्य लाभले
पुसेसावळी गावामध्ये यापुढेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून, गावातील शांतता व सलोखा अबाधित राहण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीस सहकार्य केल्याचे पुसेसावळीच्या सरपंच सुरेखा माळवे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितले.
पोलिस यंत्रणेने तपासाला गती द्यावी..
पुसेसावळी येथील दंगलीमधील दोषींवर कडक कारवाई करावी, त्याचबरोबर ज्या लोकांना अजून अटक केली नाही, त्यांना लवकर अटक करून पोलिस यंत्रणेने तपासाला गती द्यावी, या मागण्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मुस्लीम समाजबांधवांकडून करण्यात आल्या.
आमची मुलं नसतानाही त्यांना अटक..
पुसेसावळीमधील दंगलीमध्ये आमची मुलं नसतानाही त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतचे पुरावे आम्ही प्रशासनास दिले आहेत तरीही आमच्या मुलांना अटक केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अन्याय होत असल्याची भावना अटक केलेल्या मुलाच्या नातेवाइकांकडून पालकमंत्र्यांना सांगण्यात आल्या.