गाळात बुडालेल्या बोटीचा कर्मचाऱ्यांना ‘धक्का’!
By admin | Published: January 30, 2017 11:32 PM2017-01-30T23:32:34+5:302017-01-30T23:32:34+5:30
महाबळेश्वर वेण्णा लेक : अधीक्षकासह सहाजणांना कारणे दाखवा
महाबळेश्वर : वेण्णा लेक येथील बोट क्लबमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बोट क्लब अधीक्षकासह सहाजणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित पाच कर्मचाऱ्यांची तत्काळ बोट क्लब विभागातून उचलबांगडी करून त्यांना इतर विभागात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिली.
वेण्णा लेक येथे पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या बोट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार चालतात, अशा तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या तक्रारींची दखल घेऊन शनिवारी रात्री नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे मुख्याधिकारी आशा राऊत व नगरसेवक कुमार शिंदे यांनी बोट क्लबला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना येथे आर्थिक गैरव्यवहार आढळून आला. कोठेही नोंद नसलेली ६,५७० रुपये एवढी रक्कम आढळून आली. तसेच बोटमन यांच्या हजेरी व कामाच्या नोंदीमध्येही मोठी तफावत आढळून आली. अनेक बोटमन केवळ हजेरी लावतात व काम न करताच पगार घेतात तर काही बोटमन गैरहजर दाखवून त्यांच्या नावावर काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतरही रविवारी त्याच कर्मचाऱ्यांनी पदभार सांभाळून कामकाज पाहिल्याने प्रशासन या गैरव्यवहारप्रकरणी गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु सोमवारी मुख्याधिकाऱ्यांनी बोट क्लब अधीक्षक वगळता पाच कर्मचाऱ्यांची या विभागातून तत्काळ दुसऱ्या विभागात बदली केल्याने बोट क्लबवर शुकशुकाट पसरला होता. सोमवारी तीन तास बोट क्लब उशिरा सुरू करण्यात आला. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत पर्यटकांची गैरसोय झाली. अनेक पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता आला नाही. (प्रतिनिधी)