न्यायालयाचा अवमान होत असल्यास माझ्यावर ढकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:50+5:302021-03-01T04:46:50+5:30
सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. या आरक्षणाबाबत न्यायालयाचा अवमान होत असेल तर ते माझ्यावर ...
सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. या आरक्षणाबाबत न्यायालयाचा अवमान होत असेल तर ते माझ्यावर ढकला’, असे उद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.
मुंबईतील पत्रकार परिषदेत मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार उदयनराजे बोलत होते. या पत्रकार परिषदेत उदयनराजे अवघी काही मिनिटेच बोलले. पण, मराठा आरक्षणावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.
पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली होती. इतर समाजाबरोबरच मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आजच्या बैठकीतही यावर साधक-बाधक चर्चा झाली.
आरक्षणाबाबत मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघाले. गायकवाड आयोगाचा अहवालही सांगतो ७० टक्के समाज मागास आहे. पण, महाराष्ट्रातच आरक्षणाबाबत इच्छाशक्तीचा अभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. त्याची तरी यानिमित्ताने आठवण व्हावी, असेही खासदार उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
..............................................