ग्रेड सेपरेटरनंतर आज पालिकेत ‘धक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:07+5:302021-01-13T05:40:07+5:30
सातारा : धक्कातंत्र देण्यात माहीर असलेले खासदार उदयनराजे भोसले यंदा सातारा पालिकेतील सभापतिपदी महिला नगरसेवकांना संधी देऊन सर्वांनाच ...
सातारा : धक्कातंत्र देण्यात माहीर असलेले खासदार उदयनराजे भोसले यंदा सातारा पालिकेतील सभापतिपदी महिला नगरसेवकांना संधी देऊन सर्वांनाच धक्का देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या वृत्ताने आघाडीतील अनुभवी व कृतिशील नगरसेवकांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. सोमवार, दि. ११ रोजी सभापती निवडी होणार असून, उदयनराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
सातारा पालिकेत खा. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. पालिकेतील विद्यमान सभापतींचा कार्यकाल पूर्ण झाल्याने दि. ११ रोजी नूतन सभापतींच्या निवडी होणार आहेत. शहराची नुकतीच झालेली हद्दवाढ व दहा महिन्यांवर येऊन ठेपलेली पालिका निवडणूक यामुळे सभापती निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा आघाडीतील अनुभवी नगरसेवकांनाच सभापती पदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अनेक ज्येष्ठ व कामकाजाचा दीर्घ अनुभव असलेल्या नगरसेवकांची नावेही चर्चेस आली. मात्र, सर्वांच्या अपेक्षा फोल ठरणार असल्याचे समजते.
आघाडी प्रमुख खा. उदयनराजे यांनी सभापतिपदी महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यानुसार नगरसेविका अनिता घोरपडे यांना आरोग्य सभापतिपदी मुदतवाढ देण्याचे नियोजन आहे, तर पाणीपुरवठा सभापतिपदी सीता हादगे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुमती खुटाळे किंवा लता पवार, तर नियोजन समिती सभापतिपदी स्नेहा नलवडे यांची वर्णी लागू शकते. चार वर्षांच्या कार्यकाळात खा. उदयनराजे यांनी प्रथमच भाजपचे मिलिंद काकडे यांना बांधकाम सभापती पदाची संधी दिली. त्यांच्याजागी आता भाजप नगरसेविका सिद्धी पवार व आशा पंडित यांची नावे आघाडीवर आहेत.
(चौकट)
निवडणुकीचा पेपर सोपा नाही...
महिला नगरसेवकांना आजपर्यंत सभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली नाही. आघाडीप्रमुख ही उणीव यंदा भरून काढणार आहेत. निवडणूक जवळ येऊ लागल्याने नागरिकांच्या नगरसेवकांकडून अपेक्षाही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महिला नगरसेविकांची सभापतिपदी निवड झाल्यास त्यांना अधिक गतीने व सक्षमपणे काम करावे लागणार आहे. सभापती निवडीचा सर्वस्वी अधिकार आघाडीप्रमुखांचा असला तरी, ‘आगामी पालिका निवडणुकीचा पेपर सोपा मुळीच नाही’ याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.
फोटो : सातारा पालिका