वरुणराजाचा टँकरला दे धक्का !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:57+5:302021-02-11T04:40:57+5:30

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठे टिकून असल्याने ...

Push Varun Raja's tanker! | वरुणराजाचा टँकरला दे धक्का !

वरुणराजाचा टँकरला दे धक्का !

Next

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठे टिकून असल्याने जिल्ह्यातील टंचाईवरील खर्च कमी झाला आहे. यावर्षी उन्हाळ्याला सुरूवात झाली तरी अजूनही टँकरची मागणी झालेली नाही. त्यातच यंदा टंचाईग्रस्त गावे कमी आणि त्यासाठीखा खर्चही जेमतेमच होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताचा टँकर सुरू करावे लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे या तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठविण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांमध्ये तर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे पावसाचं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदा टंचाई निवारणासाठी झाला.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जून महिन्यापर्यंत १३८ गावांना टंचाईचा सामना करावा लागेल, असा अंदाज आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च येऊ शकतो. प्रशासनाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून असे टंचाई आराखडे तयार केले आहेत. ऐन उन्हाळ्यात तर जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांना टंचाई भासू शकते. पण यामधील १३८ गावांनाच यावर्षी टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. त्यासाठी जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या सर्व बाबींवरुन जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवणार आहे, हे स्पष्ट होत आहे. कारण, २०१८-१९पेक्षा यंदा पाणी स्रोतांची स्थिती चांगली आहे. सतत चांगला पाऊस आणि जलसंधारणाची कामेच यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहेत. टंचाई कमी राहण्यामुळे प्रशासनाचाही वेळ वाचणार आहे.

चौकट :

२०१८-१९ला टंचाईवर १९ कोटींचा खर्च...

जिल्ह्यात २०१८-१९मध्ये दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी जवळपास १९ कोटी रुपये खर्च आला होता. कारण, जवळपास २५० गावे आणि १ हजारांवर वाड्यांसाठी ३००च्या आसपास टँकर सुरू होते. तर साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांची तहान टँकरवर अवलंबून होती. त्या तुलनेत गेल्यावर्षी टंचाई कमी प्रमाणात होती. याला कारण म्हणजे चांगला पाऊस झाल्याने २०२०मध्ये अवघे २९ टँकर सुरू होते. जलसाठा टिकून राहिल्याने फारशी टंचाई जाणवली नव्हती.

चौकट :

माणमध्ये सुरू होते ११३ टँकर...

२०१८मध्ये जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला होता. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक नागरिक टँकरवर अवलंबून होते. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक ७८ गावे आणि ६१५ वाड्या-वस्त्यांसाठी ११३ टँकर सुरू होते. तर खटावला ४२, कोरेगाव ३६ आणि फलटण तालुक्यात ३६ टँकर सुरू होते.

...........................................................

Web Title: Push Varun Raja's tanker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.