पार्लेत परगावच्या मतदारांवरून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:10+5:302021-01-16T04:43:10+5:30
राजकीय क्षेत्रात चर्चेत असलेल्या पार्ले गावात सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. यामध्ये तीन वॉर्ड, नऊ सदस्यसंख्या ...
राजकीय क्षेत्रात चर्चेत असलेल्या पार्ले गावात सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. यामध्ये तीन वॉर्ड, नऊ सदस्यसंख्या आहे. तिन्ही वॉर्डमध्ये तुल्यबळ असलेले उमेदवार असल्याने दोन्ही गटांनी चांगली तयारी केली होती. शुक्रवारी सकाळी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. मात्र, काही वेळातच परगावी स्थायिक असलेले काही मतदार पार्लेत मतदान करण्यासाठी आले. मतदार केंद्रावर आल्यानंतर काँग्रेसच्या गटाने त्या मतदारांची त्यांच्या मूळगावातही मतदान यादीत नावे असून त्यांना येथे मतदान करता येणार नाही, असा आक्षेप घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी गटाने त्यांचे यादीत नाव आहे. त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा हक्क असल्याचा पवित्रा घेतला. परिणामी, दोन्ही गटांत शाब्दिक चकमकीसह धक्काबुक्की झाली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून संबंधित मतदारांना यादीत त्यांची नावे असल्याने आणि त्या मतदारांना जर याच गावात मतदान करण्याची मागणी असेल तर ते मतदान करू शकतात, असे स्पष्ट केले. मात्र, दुसऱ्या गावात पुन्हा मतदान करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.