स्वयंपाक न येणाऱ्या पत्नीला नदीत ढकलले
By admin | Published: June 3, 2015 10:51 PM2015-06-03T22:51:23+5:302015-06-03T23:39:55+5:30
कऱ्हाडातील घटना : विवाहिता बचावली; पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा
कऱ्हाड : स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला नदीत ढकलून दिल्याची घटना कऱ्हाड शहरातील नवीन कोयना पुलावर घडली. मच्छिमारांनी प्रसंगावधान राखून संबंधित विवाहीतेस वेळीच पाण्याबाहेर काढले. त्यामुळे ती बचावली. पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीसह सासु व सासऱ्यावर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अझरूद्दीन शरीफ सय्यद, सासु मिनाज शरीफ सय्यद, सासरा शरीफ मुसा सय्यद (तिघेही रा. गोटे, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटे येथील अझरूद्दीन सय्यद याच्याशी सना (वय २०) हिचा विवाह झाला आहे. विवाहानंतर काही दिवसातच सना व अझरूद्दीन यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून पती अझरूद्दीन याच्यासह सासू व सासऱ्याकडून सनाला मारहाणही केली जात
होती. मंगळवारी, दि. २ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सना घरकाम करीत असताना अझरूद्दीन घरामध्ये आला. त्याने तिला जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणले. आपल्या दुचाकीवर बसवून तो तीला घेऊन नवीन कोयना पुलावर गेला. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर अझरूद्दीनने दुचाकी थांबविली. त्यानंतर अझरूद्दीन व सना दोघेही पुलाच्या पदपथावर जावून थांबले. त्यावेळी अझरूद्दीन वारंवार सनाला शिवीगाळ करत होता. तसेच रागाच्या भरात त्याने तीला जीवंत सोडत नाही, असे म्हणत उचलून नदिपात्रामध्ये फेकले. सना नदिमध्ये गटांगळ्या खात असताना अझरूद्दीन दुचाकी घेवून तेथून निघून गेला. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह नदित मासेमारी करणाऱ्यांनी हा प्रकार पाहिला. यानंतर संबंधित मच्छिमारांनी पाण्यात उड्या घेवून महिलेला बाहेर काढले. (प्रतिनिधी)
मच्छिमारांनी वाचविले प्राण
मच्छिमारांनी तातडीने नदिपात्रात उड्या घेवून गटांगळ्या खाणाऱ्या सनाला पाण्यातून बाहेर काढले. काही वेळानंतर सनाचे सासू सासरेही त्याठिकाणी आले त्यांनी तिला घरी नेऊन घटनेबाबत पोलिसांना माहिती देवू नको, असे धमकावले. मात्र सना हिने धाडस करून याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानुसार पती अझरूद्दीन याच्यासह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राजेंद्र राजमाने तपास करीत आहेत.