पाणीपुरवठा योजनेसाठी राजकारण बाजूला ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:24+5:302021-07-30T04:40:24+5:30
फलटण : ‘केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक घरात स्वच्छ व निर्जंतुक पाणी पुरवठा होण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली ...
फलटण : ‘केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक घरात स्वच्छ व निर्जंतुक पाणी पुरवठा होण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना यशस्वीपणे कार्यान्वित होण्यासाठी ग्रामस्थांनी राजकारण, मतभेद बाजूला ठेवून योजनेच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी केले.
चौधरवाडी (ता. फलटण) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या सर्वेक्षणाच्या कामाचा प्रारंभ आमदार दीपक चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हणमंतराव चौधरी, श्रीराम कारखाना संचालक उत्तमराव चौधरी, शाखा अभियंता डी. बी. संत, सरपंच प्रतिभा चौधरी, मनोहर गिरमे, तात्या धायगुडे, तुकाराम कोकाटे, उपसरपंच विजय गोफणे, हेमंत भोसले, मुकुंद धनवडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले, ‘या पाणी पुरवठा योजनेसाठी विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, अंदाजे सात ते आठ कोटींच्या या योजनेचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होणार असल्याने गावात स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळणार आहे. गावातील कोणतीही वाडी-वस्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही व योजनेचे काम दर्जेदार व्हावे, याकरिता ग्रामस्थांनी एकजूट दाखवून योजनेचे काम उत्तम प्रकारे करून घ्यावे.’
पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी एस. आर. अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. ग्रामविकास अधिकारी डी. एस. भोसले यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी दत्तात्रय चौेधरी, बाळासाहेब भोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.