आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:33 PM2019-04-12T13:33:11+5:302019-04-12T14:56:35+5:30
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत
सातारा : जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. येथील वनसंपदा हीच किल्ल्याची खरी संपत्ती आहे. साग, चंदन, शिवर, धायटी, सुबाभूळ, कडुलिंब, नीलगिरी यासह विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आजही येथे आढळतात. परंतु अलीकडे या वृक्षांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे.
डोंगराच्या पायथ्याशी रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक नागरिक किल्ल्यावरील वृक्षांचा उपयोग इंधन म्हणून करीत आहे. यासाठी छोट्या-मोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. एकीकडे वणव्यात वृक्षांची होरपळ सुरू असताना आता वृक्षतोडीच्या घटनांतही वाढ होऊ लागल्याने गर्द वनराईने नटलेला अजिंक्यतारा किल्ला बोडका होऊ लागला आहे. किल्ल्यावर आतापर्यंत विविध सामाजिक संस्था व नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या हिमतीने या झाडांचे संवर्धन केले. परंतु वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोडीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. किल्ल्यावरील या वनसंपदेचे जतन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात यावीता, अशी मागणी नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
वृक्षतोडीचा नवा फंडा चर्चेचा विषय
जे वृक्ष सुकलेले आहेत अथवा पडण्याच्या मार्गावर आहेत, असे वृक्ष नागरिकांकडून तोडले जातात. परंतु हिरव्यागार वृक्षांवरही घाला घातला जातो. हिरव्यागार झाडांच्या फांद्या तोडून त्या जागेवरच टाकल्या जातात. काही दिवसांनंतर त्या सुकल्या की त्याची मोळी बांधून नेली जाते. वृक्षतोडीचा हा नवा फंडा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षतोडीच्या घटना वाढल्या आहेत. काही वर्षांपूर्वी हिरवागार दिसणारा हा किल्ला आता वृक्षांअभावी ओसाड दिसू लागला आहे. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी.
- अजित इथापे, नागरिक