येणपेत शिकाऱ्याचा गोळी घालून खून
By Admin | Published: January 8, 2017 11:37 PM2017-01-08T23:37:53+5:302017-01-08T23:37:53+5:30
गोळी घातली की चुकून सुटली? : पंचायत समितीच्या माजी सभापतीला अटक
कऱ्हाड : शिकारीला गेलेल्या युवकाचा गोळी घालून खून करण्यात आला. येणपे (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड पंचायत समितीच्या माजी सभापतीला पोलिसांनी अटक केली आहे.
कमलेश लक्ष्मण पाटील (वय २१, रा. येणपे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे, तर किसन विष्णू जाधव (वय ७५) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शिकारीला गेल्यानंतर बारा बोअरच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने कमलेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गोळी चुकून लागली की मुद्दाम झाडली, हे तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येणपे येथील किसन जाधव व अजित आकाराम जाधव हे दोघेजण शनिवारी रात्री सातच्या सुमारास गावानजीकच्या सुतारकी नावच्या शिवारात शिकारीसाठी निघाले होते. त्यावेळी गावातीलच कमलेश पाटील हा युवकसुद्धा त्यांच्यासोबत शिकारीला गेला. त्यानंतर रात्री उशिरा कमलेशला गोळी लागल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. ग्रामस्थ तातडीने सुतारकी शिवारात पोहोचले. त्यावेळी कमलेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे दिसून आले.
ग्रामस्थांनी तातडीने याबाबतची माहिती कऱ्हाड तालुका पोलिसांत दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली. त्यावेळी कमलेश शिवारात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व त्याच्या छातीवर गोळी लागल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी माहिती घेतली असता कमलेश सायंकाळी किसन जाधवसोबत शिकारीला गेला होता, अशी माहिती समोर आली. तसेच किसन जाधव याच्याकडे बारा बोअरची परवानाधारक बंदूक असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने किसन जाधवला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी चुकून सुटलेली गोळी कमलेशला लागून त्यामध्येच तो ठार झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
याबाबत मृत कमलेशचे वडील लक्ष्मण विठ्ठल पाटील यांनी कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किसन जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत.
शिकारीला तिघे; पण घटनेवेळी दोघेच!
गावातून बाहेर पडताना किसन जाधवसोबत कमलेश व अजित जाधव असे तिघेजण होते. मात्र, प्रत्यक्ष घटनेवेळी किसन जाधव व कमलेश हे दोघेजणच शिवारात असल्याचे समोर येत आहे. गोळी लागली त्यावेळी मी घरी गेलो होतो, असे अजितने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, याची खातरजमा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.